दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना काल ईडीने अटक केली. तसेच आज सकाळी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थान छापेमारीही करण्यात आली. दरम्यान, दोन्ही घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार टीकास्र सोडलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – मोठी बातमी! हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ईडीचा छापा; दीड महिन्यातील दुसरी कारवाई
काय म्हणाले संजय राऊत?
“या कारवाया राजकीय सुडबुद्धीने सुरू आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेमध्ये पदांवर नसतील, पण ते शिवसेनेच्या परिवारातील सदस्य आहेत. तर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. कदम यांना काल अटक झाली. मात्र, त्यांच्या अटकेआधी त्यांना अटक होणार हे आमचे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कोणतंही कारण नव्हतं”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – “काहीही करून हसन मुश्रीफ यांना अडकवायचं आणि..” जयंत पाटील यांची ईडीच्या छाप्यानंतर प्रतिक्रिया
“…म्हणून सदानंद कदम यांच्यावर कारवाई”
“खेडमधील उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यामागे ज्या लोकांनी मेहनत घेतली, त्यापैकी एक सदानंद कदम होते. त्यामुळे काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि कदम यांना अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीने देण्याऐवजी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो, याचा अर्थ काय? त्याला हे सर्व कसं माहिती पडतं? हसन मुश्रीफांवरील एफआयआरची कॉपी सर्व प्रथम सोमय्यांना मिळते. या राज्यात सध्या काय सुरू आहे?” असेही ते म्हणाले.
“बॅंका बुडवणारे लोक भाजपासाठी काम करतात, पण…”
“आम्ही अनेक वर्षांपासून सांगतो आहे की किरीट सोमय्यांच्या विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, पण त्याला क्लीनचिट मिळते. या देशातील बॅंका बुडवणारे लोक भाजपासाठी काम करतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण आमच्यावर हल्ले केले जातात. हसन मुश्रीफ यांच्यावर सहकारी कारखान्यावरून आरोप झाले. मी भविष्यात अनेक सहकारी कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच २०२४ मध्ये सोमयांसारख्या लफंग्यांना लोक रस्त्यावर मारतील”, असेही ते म्हणाले.
“सर्व कारवाया बोगस आहेत”
“महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या गतीने पुढे जात आहे, विशेषत: कसब्यातील निकालानंतर जे वातावरण निर्माण झाले आहे, त्याला खीळ घालण्यासाठी ईडीच्या कारवाया सुरू आहेत. सर्व कारवाया बोगस आहेत. अनिल देशमुख आणि माझ्यावरील प्रकरणांमध्ये न्यायालयाने हेच सांगितलं आहे. मात्र, केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर सुरू आहे”, असा आरोपही त्यांनी केला.