महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकावर जोरदार टीका केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
“आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देताना जी अराजक परिस्थिती निर्माण झाली. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याला सरकारचे ढिसाळ नियोजन जबाबदार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे. राज्यात १४ निरपराध लोकांचे बळी गेले. मात्र, सरकारकडून साधी संवेदनाही व्यक्त होत नाही. हे दुर्देवी आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“…तर फडणवीसांनी धुडगूस घातला असता”
“देवेंद्र फडणवीस जर आता विरोधी पक्षनेते असते, तर त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता आणि सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करूनच ते बाहेर पडले असते. मात्र, आज ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. म्हणून त्यांनी आता जुन्या फडणवीसांना जागवून मुख्यमंत्री शिंदेचा राजीनामा घ्यावा”, असेही ते म्हणाले.
“मुख्यमंत्री सुरुवातीपासून आकडे लपवत”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. “मुख्यमंत्री सुरुवातीपासून आकडे लपवत आहेत. त्यांचा पोलीस आणि प्रशासनावर दबाव आहे. ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी हा आकडा १४ पर्यंत पोहोचला, असं स्थानिक लोक सांगत होते. पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर दबाव टाकून हा आकडा सहा ते सातच सांगा, असे निर्देश दिले”, असं ते म्हणाले.