Sanjay Raut on Baba Siddique: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळीबार करून हत्या केल्यानंतर आता राज्यातील वातावरणही तापले आहे. आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधी ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. राज्याचे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना आता लक्ष्य केले जात आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली. तसेच आता त्यांचा राजीनामा नको, असे सांगत त्यांची हकालपट्टी झाली पाहीजे, असे सांगितले.

काय म्हणाले संजय राऊत?

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “बाबा सिद्दीकींच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तरीही मारेकऱ्यांनी त्यांना खुलेआम गोळ्या घातल्या. महाराष्ट्राच्या राजधानीत हत्यांचे सत्र सुरू आहे. या घटना आता माजी मंत्री, आमदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. या राज्यात कोण सुरक्षित आहे? हे राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहीजे. सामान्य जनता, महिला, व्यापारी, उद्योगपती सुरक्षित नाहीत. आता राजकीय नेते, मांजी मंत्र्‍यांवर जर हल्ला होत असेल तर गृहखाते काय करत आहे? राज्याचे गृहमंत्री हरियाणात विजय झाला म्हणून इथे पेढे वाटतात. पेढे खा, पण राज्यात दिवसाढवळ्या खून, खंडणी सत्र सुरू असताना गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही?”

हे वाचा >> बाबा सिद्दीकींना १५ दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी, ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवूनही हत्या

गृहमंत्र्यांना आता हाकला

संजय राऊत पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासतील सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद होईल. आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत होतो. पण आता गृहमंत्र्यांना हाकला, असे सांगण्यांची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि काय झाले आहेत, आमच्या डोळ्यासमोर अधःपतन झालेले पाहिले आहे.”

हे ही वाचा >> Video: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना आवाहन देताना म्हणाले की, विरोधकांच्या बाबतीत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा, गृहमंत्रीपदाची जबाबदारी कर्तव्यभावनेने पार पाडावी. एकाबाजूला आमची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. पण दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचाच एक नेता, ज्याला वाय दर्जाची सुरक्षा आहे, अशा नेत्याची हत्या होणे गंभीर आहे. गृहमंत्री यांनी यावर नुसते खुलासे करत बसू नये, त्यांनी राजीनामा द्यावा किंवा राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा.