उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीका केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
“महाविकास आघाडी सरकार असताना भाजपाचे नेते ‘हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून दाखवा’, अशी गर्जना करत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. याचं कारण काय? औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धारशीव करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मात्र भाजपा आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“भाजपाचे लोक ढोंगी”
“भाजपाचे नेते नेमकं कोणाला घाबरत आहेत. यावर निर्णय न घ्यायला कोणता कायदा आडवा येतो आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे? मुळात भाजपाचे लोक ढोंगी आहे. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केलं. मात्र, औरंगाबादचं नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – महेश आहेर यांच्या केबिनमध्ये पैशांची थप्पी, जितेंद्र आव्हाडांनी व्हिडीओ केला ट्वीट; म्हणाले…
शिंदे सरकारलाही केलं लक्ष्य
पुढे बोलताना त्यांनी आसाम सरकारच्या जाहिरातीवरूनही टीका केली. ते म्हणाले, “आसामचे मुख्यमंत्री अशी जाहीरात देत असतील तर आपले सरकार या करत आहे? राज्याचे मुख्यमंत्री खोके घेऊन आसाममध्ये पाहुणे बनून गेले होते. त्याबदल्यात आसामला ज्योतिर्लिंग दिले का? हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे.”