पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सुमारे ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्र देणार असून रोजगार मेळाव्याअंतर्गत सरकारी विभागात नुकत्याच नियुक्त झालेल्या तरुणांना हे नियुक्ती पत्र वाटप केले जाणार आहेत. दरम्यान, यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. अशाप्रकारे नियुक्तीपत्र वाटण्याचं काम आमच्याकडे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करतात, असं ते म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
“महाराष्ट्रात नगरसेवक आणि शाखाप्रमुखांच्या स्थरावर रोजगार मेळावे आयोजित केले जातात आणि त्यांना नियुक्तीपत्र वाटण्याचं कामही नगरसेवक आणि शाखाप्रमुखद्वारे केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापनाच भू्मीपुत्रांना रोजगार देण्यासाठी केली होती. मात्र, त्यांनी अशी पत्रकं कधी वाटली नाहीत, त्यांनी ८० टक्के स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी कायदा केला. पंतप्रधान आता नियुक्तीपत्र वाटून राजकारण करत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा – “वज्रमूठ सभेत मोदी-फडणवीसांबद्दल बोललात तर…” चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा म्हणाले, “आम्ही एकदा…”
पुढे बोलताना त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. “उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना त्यांचे हक्क मिळवून दिले. मात्र, तेच संविधान वाचण्यासाठी लढा द्यावा लागतोय, हे बाबासाहेबांचं दुर्देव आहे. आज देशात संविधान बचाव असे नारे ऐकू येतात. लोकशाहीचं दमन होत आहे. नागरी स्वातंत्र चिरडलं जात आहे. जे संविधान आपल्याला बाबासाहेबांनी दिलं, ते संविधान आपल्याकडून हिसकवण्याचं काम सत्ताधारी करत आहेत”, असे ते म्हणाले.