उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योजकांची आणि बॉलिवूडमधील काही दिग्ग्जांची भेट घेतली. दरम्यान, विविध उद्योजकांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – “तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजभवनाच्या दरवाज्यावर लाथ मारून…” संजय राऊतांचं मोठं विधान!

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे खूप विषय महाराष्ट्रात आहेत. योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन पाच लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशला घेऊन जातात, कुठे आहेत मुख्यमंत्री?, पाच लाख कोटींची गुंतवणूक मुंबईतून नेतात आणि आमचे मुख्यमंत्री व त्यांच वऱ्हाड आणि बिऱ्हाड हे पुढील महिन्यात बहुतेक जर्मनीत जाणार आहेत गुंतवणूक आणायला. म्हणजे तिकडे तेव्हा बर्फवृष्टीचे हवामान असते, हे बर्फ उडवायला चालले आहेत एकमेकांवर. इथून पाच लाख कोटी उडवून घेऊन गेले योगी आदित्यनाथ तुमच्या नाकासमोरून, ही महाराष्ट्राची अवस्था आहे. अडीच लाख कोटींची गुंतवणूक इकडले प्रकल्प, हे गुजरातला पळवण्यात आले. ”

या अगोदर संजय राऊत काय म्हणाले होते? –

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर येण्याअगोदर संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, “महाराष्ट्र हे औद्यागिक राज्य आहे. परदेशात सुद्धा लोक जातात उद्योग आणायला ते काही येत नाहीत. मुंबईमध्ये येऊन इथल्या उद्योगपतींशी चर्चा करायला कोणाचा विरोध नाही. जर इतर राज्यात सुद्धा तिकडचे उद्योजक गुंतवणूक करणार असतील. इथले कायम ठेवून, तर विरोध कशासाठी करायचा? हा देश एक आहे. उत्तर प्रदेशचे लाखो लोक इथे काम करतात. ते याच उद्योजकांच्या कारखान्यात काम करत आहेत. आमच्या मनात कोणत्याही राज्याविषयी द्वेष आणि सूड भावना नाही. राज्याचा विकास हा देशाचा विकास आहे. पण इकडलं पळवून नेण्याला आमचा विरोध आहे. आम्ही इकडचं ओरबडून घेऊ, पळवून नेवू याला आमचा विरोध आहे. या देशातील मोठे उद्योजक मुंबईत राहतात, मुंबई देशाची आर्थिक आणि औद्योगिक राजधानी आहे, पण ती आधी महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका.”