Sanjay Raut House Recce : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी आरोप केला होता की, शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला होता. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहाणी करणारे चार इमस मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करण्यासाठी आल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.
आमदार सुनील राऊत काय म्हणाले?
विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या म्हणण्यानुसार, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीवरील दोन व्यक्ती अनेक मोबाइल फोनसह संजय राऊत यांच्या बंगल्याच्या बाहेर थांबल्याचे दिसत आहेत. तिथून निघण्यापूर्वी ते फोनवर परिसर रेकॉर्ड करत असल्याचेही सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे. त्यांचे वर्तन संशयास्पद वाटते.”
मुंबई पोलिसांचे पत्रक
पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत असे निष्पन्न झाले की, राऊत यांच्या घराबाहेर हालचाल करणारे लोक मोबाईल टेस्ट ड्रायव्ह करत होते. मुंबई पोलिसांनी काल रात्री जारी केलेल्या आपल्या पत्रकामध्ये म्हटले की, “आज दिनांक २०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे कळविले की, आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी ०९.१५ च्या सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली असता यामध्ये आढळलेले की, हे चार इसम सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, तशी संबंधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे.”
हे ही वाचा : संजय राऊत यांच्या घराची रेकी, आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
संजय राऊतांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काल संजय राऊत यांनी दावा केला होता की, “भांडुपमधील त्यांचे निवासस्थानच नाही तर दिल्लीतील सामना कार्यालय आणि घरावरही पाळत ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नाही. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे”, असे ते म्हणाले.