शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय. “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसंच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.”
“भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला”
“नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या प्रकारे व्यापारासाठी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपाच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत नाही”
संजय राऊत म्हणाले, “जसं मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय.”
हेही वाचा : “१०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन??”; इंधनदर कपातीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
“जालियनवाला बागेत देखील ब्रिटिशांनी आमच्या विरांना चिरडलं, त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेसारखं शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असंही राऊतांनी नमूद केलं.