आज दिवसभर मुंबईत हालचालींना वेग आल्याचं दिसून आलं. सकाळी सर्वप्रथम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांची उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंसोबत बैठक झाली. यानंतर आधी देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्यापाठोपाठ नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता संजय राऊत थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्या वृत्तानंतर पाठोपाठ क्रांती रेडकर-वानखेडे आणि जास्मिन वानखेडे या दोघी देखील राज्यपालांना भेटायला पोहोचल्या आहेत. संजय राऊत आणि वानखेडे कुटुंबीय एकाच वेळी राजभवनात आहेत किंवा नाही, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी देखील राज्यपालांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. गेल्या महिन्याभरापासून वानखेडे कुटुंबावर नवाब मलिक यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात केल्या जाणाऱ्या आरोपांसंदर्भात ही भेट घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून मुंबईत आर्यन खान प्रकरण, एनसीबीची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदा आणि समीर वानखेडेंवर करण्यात आलेले आरोप या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईतलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईत दोन महत्त्वाच्या बैठका झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सकाळी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक झाली. तासभर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे देखील उपस्थित असल्यामुळे यातून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.

Devendra Fadnavis PC : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली – फडणवीसांचा बॉम्ब

यानंतर दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरची साडेतीन एकरची जमीन नवाब मलिक यांनी अवघ्या २० लाखांत खरेदी केली. या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी शाहवली खान या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेला गुन्हेगार आणि सलीम पटेल या दाऊदच्या हस्तकाकडे होती, त्यांच्याकडून नवाब मलिक यांनी ही जमीन खरेदी केली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबईत हालचाली वाढल्या, शरद पवारांच्या उपस्थितीत गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक; तर्क-वितर्कांना उधाण!

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर नवाब मलिक यांनी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. तसेच, उद्या सकाळी १० वाजता मुंबईत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला. यावेळी फडणवीसांचेच कसे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, हे देखील सांगणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.

Story img Loader