शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. राऊत हे पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. ही एक सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारची मोट बांधण्यामध्ये संजय राऊत आणि शरद पवार यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच ही भेट अनौपचारिक असली तरी शासन आणि प्रशासनासंदर्भातील काही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र या भेटीच्या बातमीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणजेच शिवसेनेची बाजू सातत्याने प्रसार माध्यमांसमोर मांडणारे राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवारांच्या भेटीमध्ये सध्याच्या ज्वलंत विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. एसटीचा संप, महागाई, इंधन दरवाढ यासारख्या विषयांवर अनौपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवरुन राऊत यांनी मागील काही दिवसांपासून भाजपाच्या काही नेत्यांवर टीका केल्याचंही पहायला मिळालं होतं. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही राऊत यांनी पवारांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल फटकारले होते.

दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना सिल्व्हर ओक आणि मातोश्रीवरुन सत्ता स्थापनेच्या चर्चा झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणामधील सत्ता केंद्रांपैकी एक असणाऱ्या सिल्व्हर ओकमधील बैठकीत राऊत आणि पवारांमध्ये काय चर्चा होते याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut meets sharad pawar at his residence silver oak scsg