शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून जागतिक गद्दार दिवस जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. ते मंगळवारी (२० जून) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “आज मी संयुक्त राष्ट्राचे महासचिव, युनिसेफ, भारताचे पंतप्रधान कार्यालय सर्वांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र मी फार गांभीर्याने लिहिलं आहे. जगात फादर्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन दिवस, योगा दिवस असे अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे जगाला गद्दारांची आठवण करून देणारा जागतिक गद्दार दिवसही साजरा करावा, अशी मागणी मी केली आहे.”

“गद्दारांनी पालनपोषण करणाऱ्या आईच्या पाठीत खंजिर खुपसला”

“जगातील सर्वात मोठी गद्दारी आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाली होती. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ४० लोकांनी गद्दारी केली. त्याचा काळा इतिहास सर्वांसमोर आहे. यापेक्षा मोठी गद्दारी जगात कधी झाली नाही. ज्या आईने पालनपोषण केलं, प्रतिष्ठा दिली त्याच आईच्या पाठीत खंजिर खुपसून गद्दार निघून गेले. यापेक्षा मोठी गद्दारी देशाच्या राजकारणात झाली नाही,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

“…म्हणून संयुक्त राष्ट्राने जागतिक गद्दार दिवस जाहीर करावा”

संजय राऊत पुढे म्हणाले, “जगाच्या वेगवेगळ्या भागात अशाप्रकारची गद्दारी झाली असेल. मात्र, ही सर्वात भयंकर घटना होती. अशा गद्दारांची आठवण म्हणून आणि त्यांना चपलाने मारण्यासाठी गद्दार दिवस असावा. म्हणूनच मी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना २० जून जागतिक गद्दार दिवस म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. ही जनतेची मागणी आहे. मी त्याचा पाठपुरावा करेन.”

हेही वाचा : “अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी, देवेंद्र फडणवीसांनी…”; राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

“महाराष्ट्रात गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जात आहेत. मोदी संयुक्त राष्ट्रातही जात आहेत. त्यामुळे मी मोदींनाही पत्र लिहिलं आहे. तेही तिथं या मागणीचा पाठपुरावा करतील. त्यामुळे हा गद्दार दिवस जाहीर करावा ही मोदींचीही जबाबदारी आहे. त्यांनी जागतिक योगा दिवसासाठी जसे प्रयत्न केले तसेच त्यांनी जागतिक गद्दार दिवसासाठीही प्रयत्न करावेत. कारण महाराष्ट्रात ही गद्दारी व्हावी यासाठी मोदींनीही प्रयत्न केले. या गद्दारीत त्यांचंही योगदान आहे. त्यामुळे त्यांना याची तीव्रता कळत असेल,” असं म्हणत राऊतांनी मोदींना लक्ष्य केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut mention pm narendra modi demand world traitor day to un pbs
Show comments