शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे. “मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीही दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, “सुरुवातीच्या काळात शिवसेना ५ ते ६ महिन्यांत बंद होईल, असं म्हटलं जात होतं”, असं देखील त्यांनी सांगितलं.

शिवसेना हा देशातला मोठा चमत्कार!

दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेना हा देशाच्या राजकारणातला मोठा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे. “देशाच्या राजकारणात शिवसेना हा खूप मोठा चमत्कार आहे. इथल्या मराठी लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. सगळे म्हणत होते की मुंबई महानगर पालिका हीच शिवसेनाची सीमारेषा राहील. जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा लोकं म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पलीकडे जाणार नाही. ५-६ महिन्यात शिवसेना बंद होईल. पण ही शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. राज्याच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले अनेक राजकीय पक्ष काळानुरूप नष्ट झाले. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी लहानातल्या लहान शिवसैनिकाला ताकद दिली, त्यामुळे शिवसेनेची पाळंमुळं आजही खोल रुजली आहेत”, असं ते म्हणाले.

आजही हिंदुत्व म्हटलं की…

दरम्यान, हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते, असं राऊत म्हणाले. “आजही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरच पुढे जात आहे. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने दूर केलेला नाही. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे राहिले आहेत. आज हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच येते. शिवाय मराठी माणसाला आजही शिवसेनाच आपला आधार वाटते”, असं राऊत म्हणाले.

“विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात”

‘दिल्लीचेही तख्त राखतो’ हे शिवसेनेसाठीच!

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेना राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय होईल असं संजय राऊत म्हणाले आहेत. “येत्या काळात शिवसेना आजपेक्षाही जास्त प्रखरपणे समोर येईल. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे कडवं शिवसेनेसाठीच लिहिलं गेलं आहे”, असं राऊत म्हणाले.

Story img Loader