माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना माझ्यावर गुन्हे दाखल करुन जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. पण, मी काहीच केलं नव्हतं, ज्यामुळे ते जेलमध्ये टाकू शकतील, असेही फडणवीस म्हणाले. या आरोपाला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलताना संजय राऊतांनी म्हटलं, “यामध्ये कोणतेही तथ्य नसून, हे विधान खोटं आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री होते. विरोधकांना तुरुंगात पाठवायचं ही संस्कृती आणि परंपरा महाराष्ट्राची नाही आहे. गेल्या सात वर्षात ही परंपरा सुरु झाली आहे. आम्ही याचे बळी आहोत. मात्र, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या सारखा सुसंस्कृत मुख्यमंत्री असताना, अशा प्रकारची घटना घडणं हे अजिबात शक्य नव्हतं.”
हेही वाचा : “…अन् उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी बंद केले”, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खंत
“राजकीय विरोधकांचं फोन टॅप करणे हा अनेक कलमांनुसार गुन्हा आहे. त्यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होत असेल, तर होऊ द्यायला हवी होती. याचे कागदावर पुरावे आहेत. पण, हे प्रकरण माझ्यापर्यंत येत अटक होईल म्हणून तुम्ही का अस्वस्थ आहात. जर तुम्ही अस्वस्थ नसता, तर सरकार आल्यावर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी थांबली नसती,” असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
“सरकार आल्यावर दौन चौकशा थांबवण्यात आल्या. त्यात पहिली ईडीसंदर्भातील आरोपांवर एसआयटी स्थापन झाली होती. दुसरी, राजकीय आणि पत्रकारांचे फोन टॅपिंग चौकशीची. या चौकशा पूर्ण होऊन द्यायला पाहिजे होत्या. यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर आलं असतं,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.