शिवशक्ती आणि भीमशक्तीची घोषणा सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून गदारोळ सुरु आहे. शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे.
“प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल विधानं करणं आम्हाला मान्य नाही. शरद पवार महाराष्ट्र आणि देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार भाजपाबरोबर आहेत, म्हणणं त्यांच्या कारकीर्दीवर मोठा आरोप आहे,” असे खडेबोल संजय राऊतांनी सुनावले आहेत.
“शरद पवार भाजपाचे असते, तर महाराष्ट्रात अडीच वर्षापूर्वी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं नसतं. पवारांनी प्रत्येकवेळी भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या एकीचा विषय येतो, तेव्हा शरद पवारांचं नाव प्रामुख्यानं येत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी जपून शब्द वापरायला हवेत,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
हेही वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ईडी-सीबीआयचा गैरवापर नाही, मी त्यांच्या जागी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांची मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.