शरद पवार यांनी एकाच वेळेस गुगली आणि सिक्स मारले. शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना १०० जन्म घ्यावे लागतील. शरद पवारांनी गुगली टाकली नसती, तर एखादे वेगळे खोके सरकार येईपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहिली असती. पण, शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष वारंवार क्लिनबोल्ड झाला, असा टोला शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सरकारच्या वर्षपूर्तीवरूनही राऊतांनी टीका केली आहे. “आम्ही सरकारकडे सरकार म्हणून पाहत नाही. महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याला आणि विश्वासघाताला एक वर्ष पूर्ण झालं,” असं टीकास्र संजय राऊतांनी शिंदे गटावर सोडलं आहे.
हेही वाचा : आदित्य ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता, खंदा समर्थक शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा
“राज्यातील ४० आमदार सकस झाले आहेत. ४० आमदारांव्यतिरिक्त राज्यातील ११ कोटी जनतेच्या चेहऱ्यावर सकसपणा दिसत नाही. राज्यासमोर कायदा, सुव्यवस्था, बेरोजगारीपासून महागाईपर्यंत अनेक प्रश्न आहेत. शरद पवारांनी बेपत्ता महिला आणि मुलींची दिलेली आकडेवारी सत्य आहे. हे सकस पणाचं लक्षण दिसतं का?,” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : कोयता हल्ल्यात तरुणीला वाचवणाऱ्या तरुणांची जितेंद्र आव्हाडांकडे मागणी, म्हणाले…
“राज्याचे गृहमंत्री इतर सर्व विषयांवर वायफळ चर्चा, आव्हानांची भाषा करतात. पण, गृहमंत्री म्हणून त्यांचा कारभार अत्यंत अपयशी आहे. राज्यात दंगली, धार्मिक तणाव, लुटमार, दरोडे याला उत आला आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत,” असेही संजय राऊतांनी सांगितलं.