राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शरद पवारांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी केलेल्या सूचक विधानामुळे आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून अनेक निष्कर्ष काढले जात असताना त्यावर आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांना महाविकास आघाडीनं २०२४ च्या निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली. “आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?” असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, त्यांच्या याच विधानावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.
“पवारांच्या विधानांचा चुकीचा अर्थ घेतला जातो”
यासंदर्भात संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. मविआच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठी. १ मे रोजी मुंबईत मविआची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
“महाविकास आघाडीच्या उभारणीत शरद पवारांचा महत्त्वाचा वाटा आहे. आम्ही सगळे आहोतच. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आहेतच. पण शरद पवारांचं महत्त्व यात आहे आणि ते राहणार. त्यांची इच्छा आहे की आपण तिघं एकत्र राहिलो, तर २०२४ साली आपण भाजपाचा पराभव करू, लोकसभाही मोठ्या संख्येनं जिंकू या शरद पवारांच्या भूमिका आहेत. मला अजिबात असं वाटत नाही की मविआसंदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. आम्ही सगळेच सातत्याने त्यांच्याशी चर्चा करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांच्या बोलण्यावरून मविआ नसावी किंवा तुटावी असं मला कधी वाटलं नाही”, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.