मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हेच पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी नातेवाईक प्रवीण राऊत यांच्या आडून हा घोटाळा केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी करून राऊत यांना जामीन देण्यास विरोध केला.
गुरू आशीष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह काही कंपन्यांचे प्रमुख असलेल्या प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षां यांच्या खात्यात ३.२७ कोटी रुपये वळवले. या घोटाळय़ाशी संबंधित आणखी नवे पुरावेही हाती लागले असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचा दावाही ईडीतर्फे महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी विशेष न्यायालयासमोर केला.
याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जाला सोमवारी ईडीतर्फे विरोध करण्यात आला. राऊत यांनी पत्राचाळ पुनर्विकासात सक्रिय रस घेतला, असा दावाही सिंह यांनी केला.
संजय राऊत यांना मालमत्ता खरेदी करण्यात रस होता आणि काही लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या पत्नीच्या खात्यात १३ लाख रुपये जमा केले. संजय राऊत यांना दु:खी करायचे नव्हते. म्हणून हे करण्यात आले. पैसे जमा झाल्याचे पुरावे आणि राऊत यांनी त्याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाकडे सिंह यांनी यावेळी न्यायालयाचे लक्ष वेधले. राऊत यांनी १.०६ कोटी रुपयांसाठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न जामीन अर्जात केला आहे, मात्र त्याचवेळी २.२ कोटी रुपयांच्या स्मरणपत्रासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
‘..म्हणूनच निवडणुकीतून माघार’
अंधेरी पूर्व येथील विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव होणार हे माहीत असल्यानेच भाजपने या पोटनिवडणुकीतून माघार घेतली, असा दावा सध्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. राऊत यांना त्यांनी केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी विशेष न्यायालयात सोमवारी आणण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी हा दावा केला. भाजपने सर्वेक्षण केले होते आणि त्यांचा उमेदवार ४५ हजार मतांनी पराभूत होणार हे त्यांना आढळून आले. त्यामुळेच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली, असा दावा राऊत यांनी केला.