मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची महामुलाखत घेतल्याचं सांगत मुलाखतीच्या पहिल्या भागाचा ट्रेलर पोस्ट केला. आज (२५ जुलै) राऊतांनी ठाकरेंच्या दुसऱ्या मुलाखतीचा ट्रेलर पोस्ट केला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीनंतर ते स्वतः सुरतला गेले असते तर पासून विश्वासमत ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं दिल्याचं दिसत आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “भाग:२ खणखणीत मुलाखत! सामना. उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर? २६ आणि २७ जुलै.”
ट्रेलरमध्ये नेमकं काय?
मुलाखतीच्या दुसऱ्या भागाच्या या ट्रेलरमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांना विश्वासमत ठरावाला सामोरे गेले असते तर काय झालं असतं असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देताना दिसत आहे. याशिवाय राऊतांनी मुंबईचाच घात करण्याची योजना यात दिसते का? असाही सवाल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच सरकारवर खोचक टोला लगावत ‘हम दो एक कमरें में बंद हो और चाबी खो जाए’ असंच हे सरकार असल्याचं म्हणतात.
हेही वाचा : “जोरदार मुलाखत, सडेतोड उत्तरे” राज ठाकरेंच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांची पोस्ट
“तुमची मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी होती का, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हाच फुटिरांचा आक्षेप आहे, फुटिरांनी आम्हाला गद्दार म्हणू नका अशी विनंती केली,” अशा विविध विषयांवर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. ही मुलाखत येत्या २६ आणि २७ जुलै रोजी प्रदर्शित केली जाईल असे जाहीर केले आहे.
“जोरदार मुलाखत, सडेतोड उत्तरे”
दरम्यान शनिवारी (२३ जुलै) रात्री संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी जोरदार मुलाखत, सडेतोड उत्तरे असं म्हणत या मुलाखतीची माहिती दिली होती. त्यानंतर राऊतांनी रविवारी (२४ जुलै) या मुलाखतीचा पहिला ट्रेलर प्रदर्शित केला. यात उद्धव ठाकरे निवडणुकीला सामोरं जाऊ आणि ज्याने पाप केलं त्याला लोक घरी बसवतील असं म्हणताना दिसले.