एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. दरम्यान, या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा – “शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, फुटीला काहीच अर्थ नाही” कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगासमोर दावा
काय म्हणाले संजय राऊत?
“शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आले आहेत. त्यांच्या एबी फॉर्मवर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे. ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्यातले काही लोकं फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली, असे म्हणता येणार नाही. काही आमदार-खासदार निघून गेले असतील, मात्र, पक्ष जागेवर आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच “पक्षातील फुटीचा जो देखावा निर्माण केला जातो, तो आभासी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत निर्णय लागत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देण्याची घाई करू नये”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर बोलताना विनायक राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “एकनाथ शिंदेंचा बोलविता धनी..”
निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटाचा युक्तीवाद
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचंही निलंबन झालेलं नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार जेठमलानी यांनी केली.
यासंदर्भात आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.