हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणाऱ्या भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दांम्पत्यावर १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर आता रवी राणा आणि नवनीत राणा यांची कारागृहात रवानगी होणार आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा न्यायालयाचा निर्णय आहे. यामध्ये सरकारचा संबंध येत नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि प्रत्येक कारवाई कायद्याने होत आहे. राणा दाम्पत्याच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलथवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. यामागे भाजपा आहे आणि हे खूप मोठं षडयंत्र आहे. त्यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे ही योग्य आहेत. अशाप्रकारे धर्माच्या नावावर राज्य उलथवण्याचा कट महाराष्ट्रतच नाहीतर कुठेही होऊ नये, असे संजय राऊत म्हणाले.

“एखाद्या पक्षाच्या मदतीने एखादा लोकप्रतिनिधी अशी कारस्थाने करत असेल तर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक विचारवंत, लेखक, कवि यांना अटक करुन राज्य उलथवण्याचा कट केल्याचा आरोप मागच्या सरकारने लावला आहे. त्यामुळे जे आता बोलत आहेत त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. सदावर्ते प्रकरणातही हेच झाले आहे. संघर्ष निर्माण करुन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची. मनाप्रमाणे घडले की राज्यपाल त्यांचेच आहेत. मग राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.  

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दोन्ही पक्षाचे प्रमुखे नेते आणि शरद पवार हे सगळे राज्य सक्षमपणे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्येक कट हा उधळला जात आहे. हनुमान चालिसाला देशात कुठेच विरोध नाही. राणा दाम्पत्याने देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाऊन हनुमान चालिसा वाचावी. महाराष्ट्रामध्ये हिंदूच्या धार्मिक कामाला कधीच कोणी विरोध केला नाही. पण तुमचा मातोश्रीमध्ये घुसून हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट होता. तुम्ही घुसणार असाल तर आम्हीही घुसू,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.

“सार्वजनिक ठिकाणी, प्रार्थना स्थळांमध्ये किंवा तुमच्या घरी हनुमान चालिसा वाचा. हिंदूना आपण नक्कीच प्राधान्य देतो. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. कोणीतरी तुमच्या खांद्यावरुन बंदूक चालवत आहे त्यामुळे तुमचा हट्ट आहे. मग असे प्रसंग निर्माण झाले की आम्ही हिंदूविरोधी आहोत असे म्हणता. नवनीत राणा या बोगस जात प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. हा किती मोठा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भाजपाचे शिलेदार बनले आहेत. भाजपा खासदार जय श्रीरामच्या घोषणेने शपथ घेत होते तेव्हा आक्षेप घेणाऱ्या नवनीत राणा होत्या. त्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये,” असे राऊत म्हणाले.

“पुन्हा प्रसंग आला तर शिवसैनिक त्यांच्या इमारतीपर्यंत जातील. शिवसैनिकांवर ही वेळ कोणी आणली? तुम्हाला खाज होती तर तुम्ही वांद्रे स्टेशनवर हनुमान चालिसा वाचू शकता. मातोश्री एक पवित्र जागा आहे. मातोश्रीमध्ये अनेक धार्मिक कार्ये पार पडत असतात. तुम्हाला हनुमानाची मंदिरे हवी असतील तर आम्ही पत्ते देतो. पण तुम्हाला तिथे न जाता गोंधळ निर्माण करायचा आहे. कारण तुमचे बोलविते धनी वेगळे आहेत. हा गोंधळ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष सुरक्षा पुरवली आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

“किरीट सोमय्यांवर हल्ला झाला नाही त्यांनी स्वतःला नखे मारुन घेतली. देशद्रोही माणसाल दगड मारण्याची या देशात प्रथा आहे. आयएनएस घोटाळा केलेल्या व्यक्तीवर पारिजातकाची फुले फेकायची का? लोकांनी रागाने दगड मारला असेल,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction after the rana couple was remanded in judicial custody abn