उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांचा अनिक्षा जयसिंघानीचे वडील अनिल जयसिंघानी यांच्याबरोबर असलेला एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यावरून विविध राजकीय चर्चा असताना संजय राऊतांनी भाजपाला-शिंदे गटाला इशारा दिला आहे.
हेही वाचा – “भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन…”; बावनकुळेंच्या विधानावरून संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!
काय म्हणाले संजय राऊत?
“भाजपा जर फोटोंचं राजकारण करत असेल, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय यांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत, हे सुद्धा बाहेर येईल. त्यामुळे यावर न बोललेलंच बरं”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. “आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही कोणाच्याही कुटुंबियांपर्यंत जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना त्रास होईल, असं दळभद्री राजकारण आम्ही कधीच केलं नाही. पण ही कटुता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रात अमित शाह-नरेंद्र मोदी यांनी आणली. आज सुद्धा एकनाथ खडसे यांचे जावाई तुरुंगात आहेत. याचं उत्तर फडणवीसांनी द्यायला हवं”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिक्षा जयसिंघानीला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
“…अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील”
“मी अनिल देशमुख, नवाब मलिक आम्ही तुरुंगात गेलो. पण कारण काय? आमच्यावर जे आरोप होतात, ते खरे आणि तुमच्यावर जे आरोप होतात ते खोटे? तुमचे कुटुंबिय तुरुंगात जातील, इतके पुरावे आमच्याकडे आहे. पण आम्ही तुमच्या कुटुंबियांपर्यंत जाणार नाही. मात्र, आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील”, असा इशाराही त्यांना दिला.