वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या कारवाईवेळी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर हातोडा मारण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून सातत्याने केला जातोय. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा घणाघात केला.
पालिकेने ठाकरे गटाच्या शाखेवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात पालिकेच्या एच-पूर्व विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शिष्टमंडळ आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असताना शाखेचे पाडकाम केलेल्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. शाखा कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करताना शिवाजी महाराजांची मूर्ती आणि बाळासाहेबांची प्रतिमा बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना केली. मात्र, कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्याने शाखेवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.
हेही वाचा >> पालिका अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून मारहाण
यावरून संजय राऊत म्हणाले की, “अनिल परब त्या भागातील विभागप्रमुख आहेत. शिवसैनिकांसोबत त्यांनी मोर्चा काढला. मोर्चामध्ये लोकांच्या भावना संतप्त आणि तीव्र होत्या. ४०-५० वर्षांची शिवसेनेची जुनी शाखा तोडली. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले गेले, सराकराला आणि अधिकाऱ्यांना लाज नाही वाटली? हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराने चाललंय ना? माझी पक्की माहिती आहे की, हातोडे मारण्याचे आदेश वर्षावरून आले.
“मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव त्यांच्याकडे कोणीतरी गेलं आणि त्यांनी आदेश दिले. पण त्यांना हे कळलं नाही की ज्या बाळासाहेबांच्या नावाने रोजीरोटी खात आहोत, कोट्यवधी कमवत आहोत, त्या बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जातात. हे कसले शिवसैनिक? वर्षा बंगल्यावरून आदेश आले. निर्लज्जपणाचा कळस आहे. हा नीचपणा आहे. ज्या बाळासाहेबांच्या नावावर जगलात, वाढलात, फुटलात त्याच नावावर राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवलंत. त्या फोटोवर हातोडे मारण्याचे आदेश देता? गुन्हे दाखल झाले, खटले दाखल झाले हे सांगू नका. बाळासाहेबांसाठी आम्ही असे अनेक खटले दाखल करून घेऊ. अनिल परब सक्षम आहोत. आम्ही सक्षम आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “…तर कॉलर धरून वांद्र्यातील अनधिकृत बांधकामे दाखवेन”, अनिल परबांचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा; म्हणाले…
केसीआर यांच्यावरही संजय राऊतांची टीका
तेलंगणातील अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रमुख लोक काँग्रेसमध्ये गेले. तेलंगणातील ६००-७० गाड्या महाराष्ट्रात आल्या. हे पैशांचं ओगंळवाणं प्रदर्शन आहे. हे शिंदे गट करतंय. हे स्पष्ट झालंय की बीआरएस ही भाजपाची बी टीम आहे. एमएमआयवाले ज्या हैदराबादवरून आले होते तिथूनच केसीआर आले. मतविभागणी करण्याव्यतिरिक्त कोणताही हेतू दिसत नाही. पैसे कुठून येतात, त्याची चौकशी व्हावी, स्वागत कसलं करता? त्यांनी कधी विठूमाऊलीचं सहकुटुंब दर्शन घेतलं होतं का? त्यांनी ठरवायला पाहिजे आपण कोणाविरुद्ध लढणार आहोत, असंही संजय राऊत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याबाबत म्हणाले.