खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांना उपचाराची गरज आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली होती. दरम्यान, या टीकेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीबाबतही भाष्य केलं.
हेही वाचा – Video: “अजितदादा म्हणजे कमाल की चीज, नेता असाच…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला!
काय म्हणाले संजय राऊत?
“श्रीकांत शिंदे हे हाडाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही, एवढं मला माहिती आहे. जी माहिती मला मिळाली होती. ती मी पोलिसांनी दिली. श्रीकांत शिंदेंनी एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. शिंदे गटाकडून माझ्याविरोधात जे मोर्चे निघत आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही. एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? एका गुंडाच्या समर्थनासाठी एक पक्ष रस्त्यावर उतरतो आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंचं सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर मोठं विधान; आमदार अपात्रतेचा संदर्भ देत म्हणाले, “राज्यात…!”
“पुण्याचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारा”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीबाबतही भाष्य केलं. “महाराष्ट्रातलं संपूर्ण मंत्रीमंडळ पुण्यात प्रचारासाठी उतरलं आहे. केंद्रीय गृहमंत्रीही पुण्याला पाय लावून गेले. एकंदरीत परिस्थिती बघता महाविकास आघाडीने भाजपासाठी ही निवडणूक किती अवघड करून ठेवली आहे, हे स्पष्ट होते. काल आदित्य ठाकरे यांनी कसब्यात रोड-शो केले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते या दोन्ही जागांसाठी प्रचार करत आहेत. काल उद्धव ठाकरेंनी व्हिडीओद्वारे भाषण केलं. त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवतील”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – श्रीकांत शिंदेंची बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल
“निवडणूक आयोगाने अन्याय पद्धतीने चिन्ह काढून घेतलं”
“निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडून अन्याय पद्धतीने काढून घेतलं तरीही आदित्य ठाकरे दोन्ही मतदार संघात जाऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे, हजारोंच्या संख्येने तरूण जमत आहेत. इथेच शिवसेना कोणाची हा निकाल लागतो. हे निवडणूक आयोगाला दिसलं नाही, त्यांनी समजून घेतलं नाही. शिवसेनाही जनतेत आहे आणि जनता ही ठाकरेंच्या मागे आहे. हे स्पष्ट दिसत आहे”, असेही ते म्हणाले.