मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधून व बैठक घेऊन हे कसे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज्यातील आर्थिक गुंतवणूक वाढीसाठी केंद्र सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ न्यावे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याबद्दल महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप-िशदे गटाकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकमेकांना दोष देण्यात महाराष्ट्राचे नुकसान होत आहे, असे राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षांत गुंतवणूकपूरक वातावरण राज्यात नव्हते व अस्थिर राजकीय परिस्थिती होती, अशी टीका भाजप नेते करीत आहेत. प्रत्यक्षात सध्या त्याहून अधिक अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याचा आरोप राऊत यांनी केला. राज्याच्या हितासाठी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असे राऊत यांनी सांगितले.