शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. यामुळेच अनेकदा ते कौतुकाचे धनी ठरतात, तर अनेकदा याच कारणाने त्यांच्यावर सडकून टीकाही होते. असं असलं तरी त्यांच्या विधानांची कायमच चर्चा होते. आता त्यांनी शिवसेनेतील बंडखोरी, पक्षफुट आणि त्याला जबाबदार कोण यावर मोठं विधान केलं आहे. यात त्यांनी शिवसेना फुटण्याला एकनाथ शिंदे जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत तकला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली हे खोटं आहे. खरं म्हणजे हा पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी फोडला, हा भाजपाने फोडला आहे. हा त्यांनी घेतलेला सूड आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. एकनाथ शिंदेंमध्ये काहीच ताकद नव्हती. यांच्यावर केंद्रीय तपास संस्थांचा धाक निर्माण करण्यात आला.”
हेही वाचा : जीवे मारण्याची धमकी आल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले…
“एकनाथ शिंदे फारतर ७-८ लोक घेऊन शकत होते. त्यांची क्षमता तेवढीच होती. बाकी आमदार केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग, निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था त्यांच्या टाचेखाली असल्याने गेले. लोकशाहीत असं होऊ नये,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.