शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केलीय. “चंद्रकांत पाटलांना शतेकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो शोक, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल. मी त्यांना शोकसंदेश पाठवतो. आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

संजय राऊत म्हणाले, मी आता चंद्रकांत पाटलांनी शोकसंदेश पाठवतो. त्यांच्यासाठी कृषी कायदे मागे घेणं ही दुःखद घटना असेल तर आपण त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. ज्या देशात आज शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो जर कुणाला शोक वाटत असेल, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल.”

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशातील अशांतता संपवण्यासाठी मी हा निर्णय घेत असल्याचं मोदींनी सांगितलंय. मी मोदींना विनंती करेन की पुन्हा एकदा सर्वांना समजावून सांगून हे शेतकऱ्याच्या हिताचे कायदे देशात पुन्हा आणले पाहिजे.”

“आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते”

संजय राऊत म्हणाले, “कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.”

“भांडवलदारांना शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला”

“नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या प्रकारे व्यापारासाठी देशात घुसली आणि देश पारतंत्र्यात टाकला त्या प्रमाणे भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला. या देशातील शेतकऱ्यांनी एक ते दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पावसाचा विचार केला नाही. रक्त, बलिदान, मंत्र्यांनी चिरडलं, पोलिसांनी गोळीबार केला, भाजपाच्या नेत्यांनी हरियाणाच्या रस्त्यावर गुंड पाठवले. यानंतरही पंजाब-हरियाणाचा शेतकरी मागे हटला नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं, भिकेत नाही”

संजय राऊत म्हणाले, “जसं मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिलंय.”

हेही वाचा : ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं रामदास कदम यांच्यावर अन्याय? संजय राऊत म्हणाले…

“जालियनवाला बागेत देखील ब्रिटिशांनी आमच्या विरांना चिरडलं, त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेसारखं शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असंही राऊतांनी नमूद केलं.

Story img Loader