मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला अब्रुनुकसानीप्रकरणी झालेल्या शिक्षेला शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी माझगाव न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, अपिलावरील सुनावणीच्या वेळी राऊत अनुपस्थित राहिल्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, अशी टिप्पणी करून राऊत यांना शुक्रवारी सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले.

दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना मेधा यांची जाणीवपूर्वक बदनामी केल्याच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून त्यांना १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला राऊत यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, अपिलावर निर्णय दिला जाईपर्यंत शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांच्यासमोर गुरुवारी राऊत यांच्या अपिलावर गुरूवारी सुनावणी झाली. त्यावेळी, राऊत अनुपस्थित होते. त्याला मेधा यांच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तसेच, सुनावणीच्या वेळी अपिलकर्त्यांनी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे असल्याचा युक्तिवादही केला. दंडाधिकाऱ्यांनी राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून राऊत पुढील सुनावणीला उपस्थित राहतील, असे राऊतांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.

हेही वाचा : रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांचे निधन

प्रकरण काय ?

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हटले होते. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता. मेधा यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होत असल्याचा निर्वाळा देऊन दंडाधिकारी न्यायालयाने २६ सप्टेंबर रोजी राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. मात्र, निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राऊतांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित करून त्यांना जामीनही मंजूर केला होता.