ठाण्यातील मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर चालवत कारवाई झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातील तणाव वाढला आहे. या कारवाईनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (११ नोव्हेंबर) पाडण्यात आलेल्या या मुंब्रा शाखेला भेट देणार आहेत. मात्र , त्याला शिंदे गटाकडून कडाडून विरोध होत आहे. अशातच पोलिसांनीही घेतलेल्या भूमिकेवर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. तसेच पोलिसांवर गंभीर आरोप केला.
संजय राऊत म्हणाले, “ते स्वतःला शिवसैनिक मानतात, पण ते अफजल खानाची औलाद आहेत. असे प्रकार मोघलाईत घडत होते. तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या बेईमान भूमिकेला पाठिंबा दिला नाही, म्हणून विरोधकांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचं काम केलं जायचं, आज बुलडोझर फिरवतात. पवित्र शाखेला आम्ही मंदिर मानतो. तेथे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांची पुजा होत होती. तेथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्यावर बुलडोझर फिरवून मिंधे गटाने आपला डीएनए काय आहे हे स्पष्ट केलं आहे.”
“पोलिसांनी उद्धव ठाकरेंना यांना मुंब्रा येथे येण्यापासून रोखण्याचं कारस्थान रचलं”
“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलं आहे. त्यासाठी पोलिसांनी तडीपार करू अशा धमक्या दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे पोस्टर, बॅनर पोलिसांसमोर फाडण्यात आले. उद्धव ठाकरेंना अडवायचं हीच पोलिसांची भूमिका आहे. आम्ही म्हणतो आडवा. त्यांना आडवायचं असेल, तर जरूर आडवा,” असं आव्हान संजय राऊतांनी दिलं.
“दिवाळीत पोलिसांना मिठाचा खडा टाकायचा आहे का?”
संजय राऊत पुढे म्हणाले, “दिवाळी आनंदाने साजरी केली जाते. त्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या दिवाळीत पोलिसांना मिठाचा खडा टाकायचा आहे का? त्यांना तसं करायचं असेल, तर पोलिसांनी जरूर उद्धव ठाकरेंना आडवावं.”
हेही वाचा : “धूर निघाला म्हणजे आग लागली आहे का?”; पत्रकाराच्या प्रश्नावर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…
“आम्ही केवळ समाचार घेणार नाही, तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार”
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी आम्ही सगळे मुंब्रा येथे जात आहोत. तेथे आम्ही केवळ समाचार घेणार नाही, तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार आहोत. संध्याकाळी ४ वाजता उद्धव ठाकरेंबरोबर आम्ही सर्वजण मुंब्रा येथे असू,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.