गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सीमाप्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही राज्यांमधील नेतेमंडळींकडून यासंदर्भात आक्रमक विधानं केली जात आहेत. हा वाद विकोपाला गेल्यानंतर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या कुरापती काढणं सुरूच ठेवलं आहे. त्यावरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“यांच्या तीन महिन्यांपूर्वीच्या क्रांतीचे हे परिणाम”

“तीन महिन्यांपूर्वी त्यांनी जी क्रांती महाराष्ट्रात केली, त्या क्रांतीचाच एक भाग कर्नाटकात दिसतोय. बोम्मई काय म्हणतायत त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यासंदर्भात बोटचेपी भूमिका घेतायत. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली म्हणजे काय केलं? जैसे थे परिस्थिती म्हणजे काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलतायत, त्यावर तुम्ही काही भूमिका मांडणार आहेत की नाही?” असा सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

“हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”

“एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या ७० वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती. सीमाप्रश्न जरी जुना असला, तरी एकमेकांच्या राज्याविषयी आदर ठेवून हा संघर्ष सुरू होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरी बोम्मईंची भाषा अशी आहे. दोन्हीकडे भाजपाचे नेते आहेत. तरी रोज उठून बोम्मई महाराष्ट्राच्या कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं.

“माझा मुद्दा हाच आहे की आपल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी…”, सीमावादावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका!

“सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय?”

“आपण वारंवार सांगता की भुजबळांसोबत आम्ही तुरुंगात होतो. अरे मग दाखवा ना तुम्ही लाठ्या खाल्ल्या होत्या ते. तो जोर, तो जोश दाखवा ना. आता तुम्ही मुख्यमंत्री आहात. सत्तेवर आहात.मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही या प्रश्नावर भूमिका घेत नसाल, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसण्यास योग्य नाही. तुम्ही इतर सगळ्या विषयांवर बोलताय. तुम्ही भूखंडाच्या संदर्भात झालेल्या आरोपांवर तासभर उत्तर देता. मग सीमाप्रश्नाबाबत बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचाच अपमान करतोय, तर तुम्ही बोलत का नाहीत? तुमची मजबुरी काय आहे. सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय?” असा परखड सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

“अमित शाहांनी गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का?”

“तुम्ही दिल्लीत गेलात, तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? बोलायचं नाही काही असं सांगितलं आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. महाराष्ट्रात यावर लाखोंचा मोर्चा निघाला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे जर राज्याच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कठीण आहे. तुम्ही ग्रामपंचायचींचे निकाल सांगताय, पण गावं चाललीयेत बाहेर ते बघा. इतकं विकलांग, हतबल राज्य कधीच झालं नव्हतं”, असंही संजय राऊत म्हणाले.

“जशास तसं उत्तर देण्याची गरज असताना महाराष्ट्राचं सरकार याबाबत लेचीपेची भूमिका घेतंय. कुणालातरी हे घाबरतायत असं वाटतंय.तुम्हाला कुणाची भीती वाटतेय याबाबत तुम्ही निर्णय घेतला तर महाराष्ट्र आपल्या पाठिशी उभा राहील. इथे राजकारण नाही. कोणत्याही पक्षाचं सरकार असो, सीमाप्रश्नावर आम्ही एक आहोत. राज्यातला प्रत्येक राजकीय नेता तुमच्या पाठिशी उभा राहील. पण तुम्ही भूमिकाच घेत नाहीत याला काय म्हणावं”, अशा शब्दांत राऊतांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena slams cm eknath shinde devendra fadnavis basavraj bommai pmw