Yogi Adityanath in Mumbai: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे. मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार असून त्यावरून संजय राऊतांनी त्यांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“…तर आमचा त्यांच्या दौऱ्यावर आक्षेप”

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर आक्षेप नसून ते राजकारण करत असतील, तर आक्षेप असेल, अशी भूमिका मांडली आहे. “मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी होत असतात. पण ते मुंबईत रोड शो कशासाठी करतायत? जर ते इथल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील. त्यांच्या राज्याच्या विकासाबाबत चर्चा करणार असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण आमच्याकडचे उद्योग ओरबाडून नेणार असतील, तर आमचा आक्षेप आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“मुंबईत रोड शो करण्याची गरज काय?”

“योगी आदित्यनाथ मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील, तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो करण्याची गरज काय? आपण इथे राजकारण करायला आला आहात की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आला आहात? मी वाचलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला कॉन्फरन्ससाठी चालले आहेत. तिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री-उद्योगमंत्री गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रोड शो करणार आहेत का दावोसच्या रस्त्यावर? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

“मला आशा आहे की अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस…”, केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचं सूचक ट्वीट; म्हणाले, “मी पुन्हा सांगतो…”

“हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण सन्मानाने आला आहात, सन्मानाने निघून जा. चर्चा करा. तुमच्याबद्दलचं प्रेम-आदर आम्हाला राहील. पण हे राजकीय उद्योग इथे येऊन शक्यतो करू नका”, असा सल्लाही संजय राऊतांनी योगी आदित्यनाथ यांना दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut shivsena thackeray group targets yogi adityanath in mumbai pmw