महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “महात्मा गांधी जुन्या भारताचे राष्ट्रपिता, तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. यावरून चर्चेला सुरुवात झाली असून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वक्तव्यावर भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

मंगळवारी नागपुरात अभिव्यक्ती वैदर्भिय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अमृता फडणवीसांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी मोदींच्या वाढदिवशी त्यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं माझं ठाम मत आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“बोम्मई रोज कानफडात मारतायत आणि मुख्यमंत्री गाल चोळत…”, संजय राऊतांचं टीकास्र; शिंदे-फडणवीसांना केलं लक्ष्य!

“मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते”,असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता!

“मी यावर नि:शब्द झालो आहे”

दरम्यान, संजय राऊतांना यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावर राऊतांनी सूचक प्रतिक्रिया दिली. आपण यावर नि:शब्द झालो असल्याचं राऊत म्हणाले. “मी नि:शब्द आहे या सगळ्यावर. नवीन नवीन ज्या भूमिका येत आहेत, त्यावर मी नि:शब्द झालो आहे. मला सुचत नाही या विषयावर काय बोलावं ते. यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच बोलतील. मी यावर बोलणं योग्य नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams amruta fadnavis on narendra modi father of nation statement pmw