गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वरमधील कथित घटनेची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर काही मुस्लीम समाजाच्या व्यक्तींनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रतिदावेही समोर येत असून खुद्द उरूस काढणाऱ्या संघटनेनंच आम्ही तसा कोणताही प्रयत्न केला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील कथित प्रकाराची चौकशी सुरू झाली असताना त्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
“महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा योजनाबद्ध रीतीने बिघडवण्याचे खेळ सुरू आहेत. कारण आज जे सत्तेवर आहेत, ते अनैतिक मार्गानं सत्तेवर आले आहेत. लोकांचा त्यांना पाठिंबा नाही. नकली हिंदुत्वाच्या नावावर ते भजन करत आहेत. अशावेळी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करायच्या आणि संपूर्ण वातावरण बिघडवायचं असा कट दिसतोय”, असं संजय राऊत माध्यमांना म्हणाले.
“आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी कुणी नाही”
“आता हे तेच लोक आहेत असे प्रश्न निर्माण करणारे. आमच्याइतके कडवट हिंदुत्ववादी देशात कुणी नसतील. आम्ही ढोंगी नाही. त्र्यंबकेश्वर हा आमच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तिथे कधीही अशा घटना घडल्याचं माझ्या स्मरणात नाही. परवाच्या घटनेत कुणीही मंदिरात घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही.मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. त्यांनीच आज त्र्यंबकेश्वरला आंदोलन सुरू केलं आहे. मुस्लीम समाजाचे सुफी संथ गुलाब शाह यांचा उरुस निघतो. गेल्या १०० वर्षांपासून ही परंपरा आहे. मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना धूप दाखवून पुढे जातात. त्यानुसारच हे झालंय. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. हे फक्त आपल्याकडे नाही”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशावरून वाद; दुसऱ्या धर्माच्या गटाविरुध्द कारवाईची पुरोहित संघाची मागणी
“अजमेर शरीफच्या दर्ग्यावर, माहिमच्या दर्ग्यावर, हाजीअलीच्या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणावर हिंदू जात असतात त्यात संघाचेही लोक असतात. तिथे पोलिसांकडूनही चादर चढवली जाते. हा श्रद्धेचा विषय आहे. पण त्र्यंबकेश्वरच्या निमित्ताने महाराष्ट्राचं वातावरण उद्ध्वस्त करायचा हा प्रयत्न आहे. एसआयटी कसली नेमताय?” असं राऊत म्हणाले.
“राम नवमीला झालेल्या दंगलींवर SIT का नाही?”
“राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. त्यावर एसआयटी नेमली का तुम्ही? नाही नेमली. असे अनेक प्रकार आहेत. या सरकारच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. तुम्हाला दंगली घडवून राजकारण करायचं असेल, तर ते यशस्वी होणार नाही. कर्नाटक निवडणुकीत प्रचाराच्या शेवटी चार दिवस नरेंद्र मोदींनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा त्यांच्याच डोक्यात पडली. मतदानाच्या दिवशी हनुमान चालीसाचं पठण तुम्ही करता आणि वातावरण बिघडवता. हे तुमचे धंदे आहेत. हा तुमचा व्यवसाय आहे. हिंदुत्व हा आमचा व्यवसाय नाही, राजकीय रोजीरोटी नाही. ती आमची श्रद्धा आहे. ज्यांचं ते नाही, ते अशा दंगली घडवतात”, असं राऊत म्हणाले.