भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी आज आपण महाविकास आघाडीचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचा इशारा दिलाय. याचसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना राऊत यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा संदर्भ देत सोमय्यांवर निशाणा साधलाय. ज्यांच्यावर स्वत:वर घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांनी घोटाळ्याबद्दल बोलल्यास लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत असा टोला राऊत यांनी लगावलाय.
नक्की वाचा >> शरद पवारांवर केल्या जाणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांवरुन राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “पुढील २५ वर्ष भाजपाला…”
“किरीट सोमय्यांनी आज आपण एक घोटाळा उघड करणार आहोत असा इशारा दिलाय,” असा प्रश्न पत्रकारांनी राऊत यांना विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी थेट दाऊद इब्राहिमचा उल्लेख केला. “पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम बसलाय आणि तो महाराष्ट्रातील घोटाळे उघड करायला लागला तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? तो गुन्हेगार आहे,” असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना, “दाऊदने जसं दहशतवादावर बोलू नये तसं आयएनएस विक्रांतसारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर ज्याने घोटाळा केलाय, लोकभावनेशी खेळलेले आहेत, जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झालेत अशांनी दुसऱ्यांच्यासंदर्भात असे खोटे आरोप करणं बरोबर नाही. लोक विश्वास ठेवणार नाहीत,” असं राऊत यांनी सोमय्यांचा थेट उल्लेख टाळत म्हटलं. पुढे बोलताना राऊत यांनी, “आधी तुम्ही तुमचा हिशोब द्या. विक्रांतचा पैसा कुठे गेला? विक्रांतसाठी पैसा गोळा केला त्याचं काय झालं याचा हिशोब द्या,” असा टोलाही सोमय्यांना लगावला.
राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये १०० कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केलाय. “आता मी या महाशयांचा एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झालाय. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत” असं म्हमत राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर निशाणा साधलाय. “हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे,” असा आरोप राऊत यांनी केलाय.
नक्की वाचा >> “भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून एका रांगेत दिलासे कसे मिळतात?; न्यायव्यवस्थेवर कोणाचा…”; राऊतांनी उपस्थित केले प्रश्न
पुढे बोलताना राऊत यांनी, “या घोटाळ्याचे कागद पाहून मला हसायला आलं. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरं म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार कणव आहे. राष्ट्रभक्ती उचंबळून जात असते भाजपाच्या लोकांची. कालपण मी पाहिलं शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केलेत. एखादं ट्विट त्यांनी आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवं. एखादं ट्विट त्यांनी या टॉयलेट घोटाळ्यावर करावं जो आम्ही काढणार आहोत. १०० कोटींच्या वर आहे टॉयलेट घोटाळा,” असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
पुढे बोलताना सोमय्यांवर निशाणा साधत राऊत यांनी, “आता ते टॉयलेटमध्ये घाण करुन ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत. पुरावे कुठेत हे त्यांनाही माहितीय. अहवाल काय आहे हे ही माहितीय. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला घोटाळा आहे. याला टॉयलेट घोटाळाच म्हणता येईल दुसरा कोणता शब्द मी वापरत नाही,” असं म्हटलं आहे.
“तुम्ही अशा कितीही प्रकारचे आमच्यावर हल्ले केले, फुसके बार सोडले तरी काही होणार नाही. आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्या. विक्रांतवर तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत. सत्र न्यायालयाने तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. सत्र न्यायालय मुर्ख आहे का? ती सुद्धा न्यायव्यवस्थाच आहे ना. त्यांना सुद्धा न्यायव्यवस्थेमध्ये मानाचं स्थान आहे. हुशार लोक आहेत ती. न्याय मागायला तिथं जावं लागतं. तुम्हाला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाने तुमच्यावर बेईमानाची ठपका ठेवलाय. पैसे गोळा केले तुम्ही, ते कुठे आहेत हे माहिती नाही आणि तुम्ही पुरावा काय मागताय. राजभवन सांगतंय तुमचं की पैसे जमा झाले नाहीत, अजून कसला पुरावा पाहिजे न्यायालयाला? बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झालेला नाही. १२ वर्ष तुम्ही पैसे हडप करुन बसला त्याच्यावर राजभवनाने जो कागद लिहून दिलाय आम्हाला त्यावर गुन्हा दाखल झालाय. लोकांची दिशाभूल करु नका,” असंही राऊत यांनी सोमय्यांवर टीका करताना म्हटलंय.