Sanjay Raut on Raj Thackeray Vikroli Rally : “काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा घाणेरडी केली आहे”, असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. राज यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांच्यावर ही टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना (ठाकरे) खासदार राऊत यांनी उत्तर दिलं आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) विक्रोळी येथे राज ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत बोलताना राज यांनी एक संपादक या परिसरात राहत असल्याचं म्हटलं. तो रोज सकाळी उठून माध्यमांसमोर बडबड करतो, त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण करून टाकली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय करू शकतो. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो. जे महाराष्ट्राची लूट करत आहेत, त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे एक हत्यार आहे आणि ज्याला जी भाषा समजते, कोणत्या शत्रूसाठी कशा भाषेचा वापर करावा हे आम्हाला बाळासाहेब ठाकरे (शिवसेनाप्रमुख) यांनी शिकवलं आहे.
संजय राऊत म्हणाले, “शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची? महाराष्ट्रातील शत्रूसाठी आम्ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही. राज ठाकरे इथे येऊन काय बोलले त्यात मला जायचे नाही. निवडणुका आहेत भारतीय जनता पक्षाची स्क्रिप्ट त्यांच्याकडे गेली आहे, फडणवीस यांची स्क्रिप्ट असेल, त्यामुळे त्यांना बोलावं लागतंय. नाहीतर ईडीची तलवार आहेच. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत, आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेले आहे. माझं बरंच आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेलं आहे. हे राजठाकरे यांना देखील माहित आहे. त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं, काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला राऊत आहे”.
हे ही वाचा >> अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात गुंडांचं राज्य चालू आहे. त्याच्यावर राज ठाकरे यांनी बोलावे. राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत. भाजपा व एकनाथ शिंदेंसाठी मुंबईतील अनेक मतदारसंघात ठाणे व पुण्यातील अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार गुंडगिरी करत आहेत. कधीकाळी अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये सहभाग होता किंवा आहे असे लोक भाजपा व शिंदेंसाठी काम करत आहेत. मी अशा गुंडांची नावं देखील देईन. राजकीय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करतात, तशीच भाजपा व शिंदेंच्या पक्षाने अनेक विधानसभा मतदारसंघात गुंडांच्या टोळ्या नेमल्या आहेत. आपले संपर्कप्रमुख असतात तसे त्यांनी गुंडांच्या टोळ्यांचे म्होरके नेमले आहेत. कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दादर, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, कलिना, कुर्ला भागात हे गुंड काम करतायत. त्यासाठी अनेकांना जामीन करून दिला आहे. अनेकांना त्यांनी आपल्या पक्षात सामील करून घेतलं आहे.