शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना नेते एकनाथ नेते यांनी केलेल्या बंडानंतर मंगळवारी (२१ जून) रात्री उशिरा एक ट्वीट केलं. तसेच त्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत गंभीर आरोप केले. “शिवसेना आमदार नितीन देशमुख यांचं अपहरण झालं आहे. त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली,” असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले, “आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपाच्या तावडीत आहेत. त्यांचे मुंबईतून अपहरण केले. सोमवारी (२० जून) रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड तेथे आहेत.”
यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करून गुजरातच्या भूमीवर हिंसा सुरू आहे का? असा सवालही केला.
“गुजरातमध्ये आमच्या आमदारांवर खुनी हल्ले”; राऊतांचा खळबळजनक आरोप
दरम्यान, संजय राऊत म्हणाले, “बऱ्याच दिवसांपासून ऑपरेशन लोटस सुरू होतं. तसं नसतं तर आमच्या आमदारांचं अपहरण करून गुजरातला नेलं नसतं. त्यांना गुजरात पोलीस व केंद्रीय पोलिसांच्या गराड्यात ठेवण्यात आलंय. अनेक आमदारांनी तेथून सुटकेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दहशत बसवण्यात आली. आमदारांवर खुनी हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. काही आमदारांनी आमच्या जीवाला धोका आहे, इथे आमचा खूनही होऊ शकतो, असं कळवलं आहे.”
गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही : संजय राऊत
“एकनाथ शिंदे यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर त्यांना आम्ही मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितलं आहे. गुजरातमध्ये जाऊन चर्चा करणं शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. त्या सर्वांना मुंबईला येण्यास सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना नेमक्या किती शिवसेना आमदारांचा पाठिंबा?; वर्षावरील बैठकीचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले…
“…तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल” ; संजय राऊत यांचा इशारा
“अनेक आमदारांच्या कुटुंबीयांना तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं अपहरण करून सुरतला नेल्याची आणि जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. आतापर्यंत ९ आमदारांच्या कुटुंबाने तक्रारी केल्या आहेत. हे असंच चालू राहिलं तर मुंबई पोलिसांना कठोर कारवाई करावी लागेल,” असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.