शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत १०० दिवसांहून अधिक कार्यकाळ मुंबईतील तुरुंगात होते. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर संजय राऊतांनी सुटका झाली. पण, ईडीने अटक करण्यापूर्वी महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ते ‘एबीपी माझा’च्या माझा कट्ट्यावर बोलत होते.
ईडीची कारवाईमागे कोणाचा राजकीय दबाव होता? किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याने पक्ष सोडण्यासाठी फोन केला होता का? असा प्रश्न विचारल्यावर संजय राऊतांनी सांगितलं, “माझ्याकडं ईडीचे लोक येणार आहेत, हे मला माहिती होतं. सुनील राऊतांकडे याची चांगली माहिती असायची.”
हेही वाचा : “मी भाकरी फिरवायला निघालो होतो, पण…”, शरद पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले…
“अटक होण्याच्या एकदिवसापूर्वी महाराष्ट्रातील एका प्रमूख नेत्याचा फोन आला होता. आज ते नेते सत्तेत आहे. ‘तुमच्यावर ईडीची कारवाई होणार आहे. मी अमित शाहांशी बोलतो. आपण काहीतरी मार्ग काढू,’ असं त्यांनी म्हटलं. यावर अजिबात मार्ग काढण्याची आवश्यकता नाही, असं त्यांना मी सांगितलं. अमित शाहांशी बोलून आयुष्यभर छातीवर ओझे घेऊन का जगू? मी गुडघे टेकले, शरण गेलो असतो तर, कोणत्या तोंडाने बाहेर जाऊ… हे सर्वांच्याबद्दल झालं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : शरद पवारांनी समितीचा निर्णय अमान्य केला तर, कोणता पर्याय असणार? जयंत पाटील म्हणाले…
“हेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसलं असून, शिवसेनेतील काही लोक याच दबावाखाली सोडून गेले आहेत. सगळेच माझ्यासारखे नाहीत… ‘जो होगा देखा जायेगा…’ ‘जास्तीत जास्त तुरुंगात टाकतील किंवा गोळी मारतील….’ आमची तयारी आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.