पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विविध विकासकामांसाठी मोदींचा आज मुंबई दौरा आयोजित करण्यात आला असून गेल्या महिन्याभरातला हा मोदींचा दुसरा मुंबई दौरा आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मोदींचे मुंबई दौरे होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यंनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत यांनी मोदींवर खोचक शब्दांत टीकाही केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“जोपर्यंत महानगर पालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत राहू शकतो. कारण पालिका जिंकण्यासाठी मुंबई-महाराष्ट्रातले भाजपा आणि मिंधे गटाचे लोक असमर्थ आहेत. ते जिंकूच शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा इतर राज्यांत त्यांनी लावला तसा आख्खा देश जरी इथे लावला, तरी मुंबई महानगर पालिका शिवसेना जिंकेल याची पूर्ण खात्री असल्यामुळेच आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय”, असं संजय राऊत म्हणाले. “ते आहेत देशाचे पंतप्रधान आणि लक्ष कुठंय तर मुंबई महानगर पालिकेवर. याचा अर्थ इथले सगळे भाजपा आणि मिंधे गटाचे नेते नाकर्ते आहेत. म्हणून पंतप्रधानांना बोलवलं आहे. कदाचित पंतप्रधान पालिका निवडणूक जिंकेपर्यंत मुंबईत घर घेऊन राहतील. राजभवनात राहतील”, असंही राऊत म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई पालिका जिंकायचीये!”
“मला पंतप्रधानांवर फार टीका करायची नाहीये. मी करू शकतो. पण दिल्लीत संसद सुरू असताना, अनेक महत्त्वाचे विषय सुरू असताना, अदाणीसारख्या विषयांवर विरोधकांनी घेरलं असताना पंतप्रधान मुंबईत येत आहेत. वंदे भारत एक निमित्त आहे. पंतप्रधानांना मुंबई महानगर पालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आम्हीही इथे तयारीत आहोत”, असंही राऊत म्हणाले.
“राज्यसभा आणि लोकसभेत विरोधी पक्षांनी पंतप्रधानांसमोर अक्षरश: गोंधळ घातला. ते गोंधळात बोलत राहिले ते ठीक आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही मागे का हटतायत? प्रश्न फार सोपे होते. अदाणींच्या मागे अशी कोणती शक्ती आहे की ते श्रीमंतांच्या यादीत ४००-५०० क्रमांकावर असताना दुसऱ्या क्रमांकावर आले. हा प्रश्न विचारताना सत्ताधारी बाकावरून मोदी मोदीच्या घोषणा होत होत्या. मग मोदी ही शक्ती आहे का अदाणींच्या मागे? ते आपोआपच उघडे पडतायत”, असं राऊत म्हणाले.
“राहुल गांधींनी विचारलं की मोदी आणि अदाणी किती वेळा एकत्र परदेशात गेले? याचं उत्तर सोपं होतं. प्रश्नोत्तराच्या तासाला अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली जातात. मोदी कठीण प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. ती उत्तरं चुकतात. या प्रकरणाची संयुक्त समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि देशात अदाणींबाबत प्रश्न उपस्थित होत असताना त्याला उत्तर द्यायला काय हरकत आहे?” असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला.