शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ( २३ जानेवारी ) जयंती आहे. त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने षण्मुखानंद सभागृहाच्या मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेनेचे नेतेमंडळी उपस्थित होते. तेव्हा बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्होस दौऱ्यावरून टोलेबाजी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डाव्होसला गेले होते. तुम्हाला आम्हाला माहिती नाही. आपल्याला फक्त दापोली माहिती आहे. डाव्होसला महाराष्ट्रातील गुंतवणूकीसाठी कार्यालय थाटलं होतं. तिथे आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे फंटर जवळ बसलेले. तेव्हा दोन-चार गोरे लोकं आले. हे गडबडले, आता त्यांच्याशी बोलायचं काय.”
हेही वाचा : एकनाथ शिंदे म्हणाले, लक्झेंबर्गचे पंतप्रधान आहेत ‘मोदी भक्त’; तुम्हाला माहितीये या देशाची लोकसंख्या किती?
“मग कोणतरी सांगितलं, हे लक्झेंमबर्ग देशाचं पंतप्रधान आहेत. लक्झेंमबर्गचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना म्हणाले तुम्ही येथे कसं. त्यावर समोरून म्हटलं हो आम्ही येथे, किती खोके देऊ तुम्हाला. येता का आमच्या पक्षात. त्यावर लक्जेमबर्गचे पंतप्रधान यांनी सांगितलं मी तर मोदींचाच माणूस आहे. अच्छा तुम्ही मोदींचे माणूस आहात, मी पण मोदींचा माणूस आहे. त्यांनी एकत्र सेल्फी काढला आणि मोदींना पाठवण्याची विनंती केली,” असं संजय राऊतांनी सांगितलं आणि सभागृहात एकच हशा पिकला.