गेल्या अनेक वर्षांपासून संजय राऊत राज्यसभेत शिवसेनेचे खासदार म्हणून काम करत आहेत. संजय राऊतांना आजपर्यंत त्यांच्या विरोधकांनी, भाजपामधील अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक जिंकून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. आता संजय राऊत मुंबईतून ठाकरे गटाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. खुद्द संजय राऊतांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चेला खतपाणीच मिळाल्याचं आता बोललं जात आहे.
संजय राऊतांच्या उमेदवारीची चर्चा
ठाकरे गटातील ४० विद्यमान आमदार व १३ खासदार शिंदे गटात गेल्यामुळे आता विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार निवडीवर पक्षांतर्गत चर्चा चालू आहे. यामध्ये ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून संजय राऊतांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खुद्द संजय राऊतही ही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं आहे.
“जर पक्षानं आदेश दिला तर…”
यासंदर्भात उत्तर देताना पक्षादेशाचं पालन करेन, असं राऊत म्हणाले आहेत. “पक्षानं आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज व पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी मी आहे. मला विचारलं इशान्य मुंबईतून तुम्ही निवडणूक लढवणार का. मी म्हटलं पक्षानं आदेश दिला तर मी काहीही करीन”, असं राऊत यावेळी म्हणाले.
“ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर झाले”, भाजपाच्या मंत्र्यांचं विधान चर्चेत…
“इशान्य मुंबईत संजय राऊत सोडून द्या, आमचा साधा शिवसैनिक जरी निवडणुकीला उभा राहिला, तरी तो दोन ते सव्वादोन लाख मतांनी निवडून येईल अशी स्थिती आहे. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिथे सातत्याने शिवसेनेच्या सहकाऱ्याने भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे तिथे आमच्यातला साधा पदाधिकारी, कार्यकर्ता जरी उभा केला, तरी तिथून शिवसेनेचाच खासदार निवडून येईल”, असा विश्वास राऊतांनी यावेळी व्यक्त केला.