शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या करोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार होते. मात्र मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना विरोधकांना इशारा दिला आहे. हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
“५६ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत एक ठिणगी टाकली. त्यातून देशभरात जो वणवा पेटला आहे त्याचा आज वर्धापण दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आज पितृदिन असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे या देशाला बाप नाही. पण आज मी सांगू इच्छितो की हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. जगभरात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापच मानतो आणि बाप एकच असतो. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन हिंदुत्वाचे बाप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, कसे आहे आणि कोणत्या दिशेने चालले आहे त्याचे कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
“आतापर्यंत फक्त ५६ वर्ष झाली आहेत पण अजून पुढे बरेच आहे हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात एखादी जागा एकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांसाठी घालमेल सुरु आहे. पण एक जागा जिंकली म्हणून तुम्ही जग जिंकले असं होत नाही. या राज्याची सुत्रे ही शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. त्यामुळे फार घमंड करु नका,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.