शनिवारी पुण्यात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खेडमधील घडामोडींवरून राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला होता. विशेषत: “या जिल्ह्याचे या भागाचे महत्वाचे नेते म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं”, असं म्हणत त्यांनी रोख अजित पवार यांच्या दिशेने वळवला होता. त्यावर आज सकाळी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. “आम्ही नियम, मर्यादा, लक्ष्मणरेषा पाळतो. पण तुम्ही नियम मोडत असाल, तर आम्हाला देखील तो अधिकार आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच, हा सर्व प्रकार स्थानिक पातळीवर होत असून त्याचा वरीष्ठ नेत्यांशी संबंध नाही, असं देखील राऊतांनी नमूद केलं आहे.
“शिवसेनेचे सदस्य पळवण्यात आले”
खेडमधले शिवसेनेचे स्थानिक सदस्य पळवण्यात आले, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. “हा विषय खेडपुरता मर्यादित आहे. खेडमधले शिवसेनेचे आमचे सदस्य पळवण्यात आले. त्यांनी आमिषं दाखवण्यात आली. दहशत निर्माण करण्यात आली”, असं राऊत म्हणाले. खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याचे दिसत आहे.
… त्यामुळे मला याचा राग येतो; अजित पवार भाजपावर भडकले
“वरीष्ठ नेत्यांशी संबंध नाही”
दरम्यान, हा वाद स्थानिक पातळीवर सुरू असून याचा वरीष्ठ नेत्यांशी संबंध नाही, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. “तीन पक्षांनी एकत्र बसून घ्यायचा हा निर्णय आहे. महाविकासआघाडीमघ्ये कोणतंही भांडण नाही. या प्रकाराशी अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी काही संबंध नाही. किंवा आमच्या शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांशीही याचा काही संबंध नाही. हे स्थानिक पातळीवरचे आमदार किंवा अन्य लोकांनी घडवून आणलं आहे. असे प्रकार घडू नयेत ही शिवसेनेची भूमिका आहे. आपण महाविकासआघाडीमध्ये आहोत. दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांविषयी काही निर्णय घेताना त्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तो नियम तोडत असाल, तर तो अधिकार आम्हालाही आहे. आम्ही नियम पाळतो. आम्ही या लक्ष्मणरेषा आणि मर्यादा पाळतो”, असं ते म्हणाले.