१२ मार्चच्या बॉम्बस्फोटांप्रकरणी आलेल्या शस्रांपैकी काही शस्र्ो अभिनेता संजय दत्त याच्याकडे होती, असा आरोप जेव्हा पहिल्यांदा १५ एप्रिल १९९३ रोजी केला गेला तेव्हा तो मॉरिशसमध्ये चित्रिकरणात गुंतला होता. त्याच्या मित्रांकडून ही माहिती त्याला मिळाली. त्याने दुसऱ्या दिवशी तत्कालीन पोलीस आयुक्त अमरजितसिंग सामरा यांना कार्यालयात दूरध्वनी केला. (त्यावेळी अर्थात मोबाईल नव्हता.) बॉम्बस्फोटांशी आपला काहीही संबंध नाही, असे तो सांगू लागला. आपण म्हणत असाल तर लगेच परततो, असे म्हणणाऱ्या संजुबाबाला, तू निर्दोष आहेस तर कशाला काळजी करतोस?, चित्रिकरण संपवून ये, असे सामरांनी सांगितले. चार दिवसांनी म्हणजे १९ एप्रिलला संजुबाबा परतला. विमानतळावरून तो थेट गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात गेला. निवृत्त सहायक आयुक्त सुरेश वालिशेट्टी त्यावेळी तेथेच होते. आपला काहीही संबंध नाही, असे सांगणाऱ्या संजुबाबासमोर समीर हिंगोरा आणि हनीफ कडावाला या दोघांना आणले गेले तेव्हा संजुबाबाची बोलतीच बंद झाली. मार्च १९९३ च्या स्फोटासाठी आणल्या गेलेल्या चार एके ५६ रायफली व एक रिव्हॉल्व्हर आपल्याकडे सुपूर्द करण्यात आली होती, अशी कबुली संजुबाबाने दिली. या रायफलीपैकी फक्त एक रायफल व एक रिव्हॉल्व्हर आपण ठेवली आणि उर्वरित रायफली परत केल्या, असे सांगितले होते.
आपल्याकडील रायफल व रिव्हॉल्व्हरची विल्हेवाट लावण्यासाठी भेंडीबाजारातील युसुफ नळवाला दिली, अशी माहिती संजुबाबाने दिली. त्यानंतर नळवालाला अटक करण्यात आली. त्याने ही रायफल केरसी अदाजनिया याच्याकडे जाळण्यासाठी दिली होती. केरसीला ताब्यात घेईपर्यंत एके ५६ रायफल नष्ट करण्यात आली होती. परंतु या रायफलची स्प्रिंग पोलिसांना त्याच्याकडे मिळाली. नंतर रिव्हॉल्व्हरची नळीही मिळाली. त्यामुळे अडकलेल्या संजुबाबाचा निर्दोषत्वाचा दावा न्यायालयाने मात्र कधीच मान्य केला नाही. टाडा न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली संजुबाबाला दोषी ठरविले होते. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर सुनावणी झाली आणि संजुबाबाभोवती तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा पाश आवळले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा