‘लोकसत्ता- संवर्धन प्रतिष्ठान’ परिसंवादातील सूर
भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल तर अन्य भाषांबरोबरच संस्कृतचा अभ्यासही आवश्यक आहे. मात्र त्यासाठी संस्कृत प्रवाही असण्याची गरज आहे. तिला चौकटीत बंदिस्त केले तर तिची व्यवहार्यता संपुष्टात येईल, असे मत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
‘लोकसत्ता’ आणि ‘संवर्धन प्रतिष्ठान’ यांच्यातर्फे रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात ‘संस्कृत शिकणे राष्ट्रीय गरज’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात ‘संस्कृत आणि अन्य भाषा : समन्वय की संघर्ष’ या तर दुपारच्या सत्रात ‘इंग्रजीच्या जागतिक प्रभावासमोर भारताने संस्कृतची कास धरावी का?’ यावर विचारमंथन झाले.
पहिल्या सत्रातील चर्चेत संत साहित्याचे अभ्यासक प्रा. सदानंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, संस्कृत अभ्यासक गणेश थिटे आणि गणेश अर्नाळ सहभागी झाले. संस्कृत भाषेत शिक्षण घेतले तर त्या व्यक्तीला नोकरी मिळेल का, असा प्रश्न प्रा. मोरे यांनी उपस्थित केला. भाषेचा कोष तयार करून कोणतीही भाषा वाढत नाही तर कृतीचा विस्तार होणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अन्वर राजन यांनी सांगितले की, ज्ञान वेगळे आणि भाषा वेगळी हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. भाषा ही उत्पन्नाचे आणि शोषणाचे साधन आहे. भाषा हा सत्तेचा भाग आहे. सत्ता मिळवायची असेल तर संस्कृत शिकावी वागेल, असे मत व्यक्त केले.
संस्कृतच्या शुद्धतेचा आग्रह धरताना गणेश थिटे यांनी सांगितले की, संस्कृतचे पुनरुज्जीवन अयोग्य आहे. संस्कृत व्यवहारी होणे कठीण आहे. संस्कृतचा अर्थ संस्कार असा आहे. तिच्यावर पाणिनीने संस्कार केले. व्याकरण सांभाळूनच तिचा वापर झाला पाहिजे. मात्र ती विश्वभाषा करण्याच्या प्रयत्नात त्यात अशुद्धता जास्त येईल आणि ती प्रदूषित होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. रविन थत्ते यांनी सांगितले की, संस्कृतचा वापर करून आपली बोली भाषा अधिक संपन्न करण्याची आवश्यकता आहे.
दुसऱ्या सत्रातील चर्चेत रिपब्लिकन नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, उद्योजक दीपक घैसास, जर्मन भाषा अभ्यासक वैशाली करमरकर आणि केंद्रीय सचिव धर्मेश शास्त्री यांनी मतप्रदर्शन केले.
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी, जुने दाखले देतानाच संस्कृत ही इंग्रजीला पर्याय होऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. इंग्रजी ही जागतिक भाषा नाही, असे स्पष्ट करताना दीपक घैसास यांनी काही ठराविक व्यवहारांमध्ये तिचा वापर होत असल्याचे स्पष्ट केले तर वैशाली करमरकर यांनी संस्कृतला बंदिस्त न ठेवता प्रवाही करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. संस्कृत ही भाषा मरणारी नाही. तिच्यामध्ये सर्वाधिक साहित्य असून मानवता टिकवायची असेल तर संस्कृत शिकावेच लागेल असे धर्मेश शास्त्री यांनी सांगितले.
‘संवर्धन प्रतिष्ठान’तर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या रघुनाथ गायधनी, वृषाली भिडे, सुमन चिंचणकर आणि सागर कारखानीस यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रभाकर भातखंडे यांचाही दीपक घैसास यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रसन्न जोशी यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पाटील यांनी संस्कृत आणि मराठी भाषेतून केले.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
How to look at Manusmriti and the Caste System
Manusmriti and the Caste System मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेकडे कसे पाहावे? देवदत्त पट्टनायक यांच्यासह भारतीय संस्कृती आणि कलेचा घेतलेला आढावा!
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
ग्रंथसंपदेचे राखणदार: आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Coastal heavy rainfall, artificial rainfall, IITM,
किनारपट्टीवरील अतिवृष्टी कृत्रिम पावसाद्वारे टाळणे शक्य, सविस्तर वाचा ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांचा अभ्यास
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
The need for a culture that recognizes the meaning of the words Nidhipati and Representative
‘निधिपती’ – ‘प्रतिनिधी’ या शब्दांचा अर्थ ओळखणाऱ्या संस्कृतीची गरज