लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: संस्कृत विषयातील तज्ञ आणि वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक दीपक भट्टाचार्य यांचे शुक्रवारी रात्री मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नात असा परिवार आहे.
कोलकाता येथील शांतिनिकेतनमध्ये रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठात दीपक भट्टाचार्य संस्कृतचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांचे वडील दुर्ग मोहन भट्टाचार्य हे कोलकाता येथील संस्कृत महाविद्यालयात प्राध्यापक होते. दुर्गमोहन यांनी ओरिसामधील अथर्ववेदाच्या शाखेचा शोध लावला. येथील लोकांना भेटून त्यांनी या शाखेची माहिती आणि पोथ्या घेतल्या. अथर्ववेदाच्या ‘पैपलाद शाखे’च्या संहितेच्या ग्रंथ प्रकाशनाचे काम त्यांनी हाती घेतले होते. आपल्या वडिलांचे अर्धवट राहिलेले हे काम पुढे दीपक यांनी पूर्ण केले आणि हा चार खंडांचा मोठा ग्रंथ प्रकाशित केला. कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीने हा ग्रंथ प्रकाशित केला होता. त्यांचे हे काम जागतिक कीर्तीचे आहे. वेदाच्या अभ्यासकांना या ग्रंथामुळे विपुल साहित्य उपलब्ध झाले आहे.
आणखी वाचा- मुंबई : अंधेरी परिसरातील ‘हायमास्ट’च्या दुरुस्तीसाठी ६९ लाखांचा खर्च
दीपक भट्टाचार्य हे केवळ संस्कृत तज्ञच नाहीत तर जर्मन भाषाही त्यांना अवगत होती. देश-विदेशात संस्कृत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. संस्कृत, वेद, भाषाशास्त्र यामध्ये त्यांनी खूप मोठे व महत्त्वाचे काम केले आहे. गेल्या काही काळापासून ते मुंबईत आपल्या मुलीकडे राहत होते, अशी माहिती अथर्ववेद विषयातील अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांनी दिली. भट्टाचार्य यांच्या जाण्याने अतिशय मोठा विद्वान आणि सरळ मनाचा माणूस गमावला आहे, अशी भावना बहुलकर यांनी व्यक्त केली आहे.