मुंबई : वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधणाऱ्या संत मुक्ताबाईंचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीवनप्रवास उलगडून दाखविणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा मराठी चित्रपट १८ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा संगीत सोहळा मुंबईतील दादर येथे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी स्वतःच्या ४८ वर्षांच्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासात पहिल्यांदा चित्रपटाच्या गाण्याचे आगळेवेगळे अनावरण आणि जिवंत संगीत सोहळा पाहून भारावून गेल्याची भावना सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.

संत मुक्ताबाईंनी निभावलेल्या माता, भगिनी, गुरू, मैत्रीण अशा विविध भूमिकांचे पदर ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातून उलगडणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवार, १२ एप्रिल रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटातील विविध गीते – अभंग मालिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध गीतांचे व काही प्रसंगांचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच लक्षवेधी नृत्याविष्कारही उपस्थितांनी अनुभवला. तर दिग्पाल लांजेकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. याप्रसंगी प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, ‘ए ए फिल्म्स’चे अनिल थडानी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर, मंजिरी मराठे आदी मान्यवर आणि चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या संगीत अनावरण सोहळ्याला मला उपस्थित राहता आले, याबद्दल भाग्यवान समजतो. या निमंत्रणासाठी दिग्पाल लांजेकर यांचा आभारी आहे. मला मनोरंजनसृष्टीत ४८ वर्षे झाली. पण आयुष्यात पहिल्यांदा गाण्याचे अनावरण अशा पद्धतीने पाहत आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचा जिवंत संगीत सोहळा पाहून भारावून गेलो. त्यामुळे हा सोहळा आगळावेगळा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा सर्वांच्या हृदयात नेहमीच जागी असते आणि हा सोहळा व चित्रपटाने आणखी जागी करीत आहात, त्याबद्दल दिग्पाल लांजेकर यांचे आभार. अप्रतिम गाणी व संगीत असलेल्या या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळो आणि हा चित्रपट लोकांच्या घराघरात जावो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना’, असे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर म्हणाले.

‘दिग्पाल लांजेकर यांच्यासोबत काम करताना नेहमीच एक वेगळा अनुभव आणि आनंद असतो. त्यांच्यामध्ये भरपूर कौशल्य भरलेले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा’, असे ‘ए ए फिल्म्स’च्या अनिल थडानी यांनी सांगितले. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही वितरण संस्था करीत आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे असून संत मुक्ताबाईंची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर, तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत. तर संगीताची जबाबदारी अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे.