अनेक शतके मराठी भावजीवन व्यापून राहिलेले संतवाङ्मय आता इंग्रजी भाषेतही आपला दबदबा आणि आब वाढवत आहे. अभंग आणि ओव्याचे हे अद्भुत संस्कृतिधन परदेशातील इंग्रजी वाचकांनाही भावसंपन्न करत आहे. गेल्या वर्षभरात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक संतांच्या साहित्याचे इंग्रजी अनुवादित सुमारे ४० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. विशेष म्हणजे या साहित्याला परदेशात मागणी वाढत असल्याने एक ते दोन महिन्यांत या ग्रंथांची पाचवी ते सातवी आवृत्ती प्रकाशित केली जात आहे.

गेल्या काही वर्षांत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या वाङ्मयाचा आणि शब्दकळेचा अनेक परदेशी अभ्यासकांकडून समग्र अभ्यास केला जात आहे. आजही परदेशी विद्यापीठात वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राचे संतवाङ्मय यावर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आहे. चीन आणि जपान या देशांत अध्यात्माला विशेष स्थान आहे. त्यामुळे भारतीय संत साहित्याचा अभ्यास या देशात मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. अशा देशांतील अभ्यासक महाराष्ट्रातील संत्य साहित्य प्रकाशित करणाऱ्या अनेक प्रकाशकांना सतत भेटत असल्याचे सांगितले जात आहे. यात विशेषत: सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्रीतुकारामाची गाथा, सार्थ श्रीएकनाथी भागवत अशा साहित्याचा इंग्रजी अनुवादाला परदेशातील अभ्यासक आणि वाचकांकडून पसंती दिली जात आहे.

गेल्या आठ ते दहा वर्षांत परदेशात शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तसेच वास्तव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या अधिक आहे. अशा वेळी आपल्या मुलांना संतांच्या साहित्यातील मूल्ये समजावीत यासाठी इंग्रजी अनुवादित पुस्तकांची ऑनलाइन खरेदी केली जात आहे. तसेच परदेशात राहिल्याने अभिजात साहित्यापासून आपण दुरावत असल्याची भावना मनात असल्याने वाचक संत साहित्याकडे वळत असल्याचे जाणकार सांगतात.

परदेशात संत साहित्याला प्रचंड मागणी आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक मराठी संत साहित्याचे इंग्रजी अनुवाद केले आहेत. यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचे साहित्य परदेशात अधिक वाचले जात आहे. सध्या मराठीत असलेल्या ‘सार्थ श्रीतुकारामाची गाथा’ या ग्रंथाच्या अनुवादाचे काम ज्येष्ठ साहित्यिक डी. ए. घैसास करत आहेत.

– ज्योती ढवळे,  ढवळे प्रकाशन संस्था

 

 

Story img Loader