मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सध्या सांताक्रुझ – चेंबर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत वाकोला नाला – पानबाई इंटरनॅशनल शाळेदरम्यान १.०२ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या उन्नत रस्त्यात स्टील केबल स्टे पुलाचा समावेश असून या उन्नत रस्त्याच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच एमएमआरडीएने यशस्वीरित्या पूर्ण केला. उन्नत रस्त्यावरील शेवटच्या २१५ मीटरच्या ऑर्थोट्राॅपिक स्टील डेकची यशस्वी उभारणी करण्यात आली. त्यामुळे आता उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार असून या रस्त्याचे काम मे अखेरीस पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर वाकोल्यातील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे. दुसरीकडे चेंबूर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सिग्नलमुक्त आणि अतिजलद होणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडून प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता बांधला. या जोडरस्त्यावरून पुढे कुर्ला, बीकेसी आणि वाकोल्याला जाणे सोपे व्हावे यासाठी सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला. ६४५ कोटी रुपये खर्चाच्या या विस्तारीकरणातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्यातील वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्ता आणि भारत डायमंड बोर्स – वाकोला रस्त्याचे काम होणे शिल्लक आहे. वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्ता केव्हा पूर्ण होणार याकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष लागले आहे. सध्या वाकोला येथे या रस्त्याचे काम सुरू असून मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामामुळे वाकोल्यात प्रंचड वाहतूक कोंडी होत आहे. हतूक कोंडीमुळे वाहनचालक-प्रवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे हे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. हे काम पूर्ण झाल्यास वाहतूक कोंडी दूर होणार आहेच, पण त्याचवेळी चेंबूर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास अतिजलद, सिग्नलमुक्त होणार असल्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची मुंबईकरांना प्रतीक्षा आहे. आता एमएमआरडीएने या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून याअनुषंगाने मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्यावर २१५ मीटरच्या ऑर्थोट्राॅपिक स्टील डेक स्पॅनची नुकतीच यशस्वी उभारणी करण्यात आली. हा शेवटचा ऑर्थोट्राॅपिक स्टील डेक स्पॅन असल्याने आता उन्नत रस्त्याच्या कामाला वेग येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. हा उन्नत रस्ता जमिनीपासून २५ मीटर उंचीवर असून या उन्नत रस्त्यात आशियातील पहिल्या स्टील केबल स्टे पुलाचा समावेश आहे. हे पूल इंग्रजीतील वाय अक्षराप्रमाणे असून तो १०० मीटर वळणाचा आहे. या स्टील केबल स्टे पुलाचे कामही वेगात सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर या उन्नत रस्त्याचे काम मेअखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच मे अखेरीस काम पूर्ण करून जूनमध्ये हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनपासून वाकोल्यातील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार असून चेंबूर – वोकाला, पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास अतिजलद होणार आहे.