कुर्ला ते वाकोला उन्नत मार्गाचे ८० टक्के ; तर भारत डायमंड बोर्स ते वाकोला उन्नत मार्गाचे ८६ टक्के काम पूर्ण
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या कुर्ला ते वाकोला आणि भारत डायमंड बोर्स ते वाकोला उन्नत मार्गाच्या कामाला अखेर वेग देण्यात आला आहे. अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला असून या नव्या वर्षात मात्र हा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवले आहे. आतापर्यंत कुर्ला ते वाकोला उन्नत मार्गाचे ८० टक्के ; तर भारत डायमंड बोर्स ते वाकोला उन्नत मार्गाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम पूर्ण करून या वर्षात हे दोन्ही उन्नत मार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. हे मार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वाकोला, कुर्ला आणि बीकेसीतील वाहतूक कोंडी सुटणार आहे.
हेही वाचा >>> मुंबईच्या जलप्रक्रिया केंद्रावर सीसीटीव्हीची नजर
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरून वेगात येणाऱ्या वाहनांना कुर्ला, वाकोला आणि बीकेसीत वाहतूक कोंडीत अडकावे लागते. हि अडचण सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत कुर्ला ते वाकोला आणि वाकोला ते भारत डायमंड बोर्स असे दोन उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. २०१६ मध्ये या कामास सुरुवात झाली असून हे काम २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम संथगतीने सुरु असल्याने २०२३ उजाडले तरी हे काम पूर्ण झालेले नाही. पण आता मात्र या वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या दोन्ही उन्नत मार्गाचे काम
प्रगतीपथावर आहेत. कुर्ला ते वाकोला उन्नत मार्गाचे आतापर्यंत ८०टक्के काम पूर्ण झाले आहे. तर भारत डायमंड बोर्स ते वाकोला उन्नत मार्गाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असेही त्यांनी सांगितले. आता उर्वरित काम वेगात पूर्ण करत याच वर्षात हे दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले होतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हा प्रकल्प रखडल्याने प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पण आता हे मार्ग सुरु होणार असल्याने पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात जाणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.