‘अंनिस’चे सध्याचे अध्यक्ष श्याम मानव यांनीच दोन कोटी रूपयांसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली, असा आरोप सनातन संस्थेकडून मंगळवारी करण्यात आला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत अभय वर्तक आणि संजीव पुनाळेकर यांनी ‘सनातन’ची बाजू मांडताना हे सांगितले. यावेळी संजीव पुनाळेकर यांनी सरकारी निधी मिळविण्यासाठी श्याम मानव यांनी दाभोलकरांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला. याशिवाय, श्याम मानव हे आमच्या संघटनेवर उलट-सुलट आरोप करत असून त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा ‘सनातन’ची लेखी माफी मागावी, असेही अभय वर्तक यांच्याकडून सांगण्यात आले. ‘सनातन’च्या साधकांवर संमोहनाचा वापर करून त्यांना एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी ‘सनातन’च्या समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांनी केली होती. मात्र, या माध्यमातून श्याम मानव लोकांच्या मनात वैज्ञानिक गोष्टींविषयी भय उत्त्पन्न करत असून त्यांची ही मागणी विकृत असल्याचे वर्तक यांनी सांगितले. सनातन संस्थेत कुणावरही संमोहन शास्त्राचा प्रयोग केला जात नाही. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप सुरु आहेत. त्यामुळे त्यांनी एकतर आमच्यावरील आरोप सिद्ध करावेत, अन्यथा आमची माफी मागावी, असे वर्तक यांनी म्हटले.
‘अंनिस’चे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
दरम्यान, ‘सनातन’च्या आरोपांना उत्तर देताना श्याम मानव यांनी ‘सनातन’चे पितळ उघडे पडल्यामुळेच ते आता माझ्यावर आरोप करत असल्याचे सांगितले. सरकारने जादूटोणा विरोधी कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेला १ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, आम्ही तो न स्विकारताच सरकारच्याच सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाकडे सोपविण्याचा प्रस्ताव ठेवला. याशिवाय, आता आम्ही सनातनला कायदेशीर नव्हे तर सगळ्याच पातळ्यांवर सळो की पळो करून सोडू, असेही मानव यांनी म्हटले.