मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गुंतलेले असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा. त्याचप्रमाणे बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांत न्यायायलयीन चौकशीचे आश्वास देऊनही अद्याप न्यायाधीशांची नेमणूक झालेली नाही. न्यायाधीशांची नेमणूक करून याची तत्काळ चौकशी यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
मस्साजोगमधील सरपंच देशमुख यांची हत्या, परभणीमध्ये पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी सर्वसामान्यांचा आक्रोश पोहोचविण्यासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे हे या भेटीवेळी उपस्थित होते.
मनोज जरांगेंविरुद्ध चार गुन्हे
बीड जिल्ह्यातील बीड, धारूर, अंबाजोगाई व परळी पोलीस ठाण्यांमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी परभणी येथील मोर्चामध्ये अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात व सामाजिक तेढ निर्माण करणारे, घरात घुसून मारू, अशी धमकी देणारे वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी परळी, धारूरमध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा >>>माघी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी, घरगुती मूर्तीही पर्यावरणपूरकच हव्यात
निवेदनात काय?
देशमुख हत्याप्रकरणातील तपासावर परिणाम होऊ नये, यासाठी चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांची निष्काळजी आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे या निवेदनात शिष्टमंडळाने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यानंतरही स्थानिक पोलीस आणि सीआयडीलाही आरोपी सापडत नव्हते. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराड तीन राज्य फिरून मग शरण आला, तरी राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेला पत्ता लागला नाही. अद्यापही त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाही. राज्य सरकार ऐकत नाही, त्यामुळे अखेर राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपालांची भेट घेतली.– अंबादास दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते
जातपात आणि राजकारणाच्या पलीकडील हे प्रकरण आहे. महाराष्ट्राला या प्रकरणात न्याय द्यावा लागणार आहे. मात्र देशमुख यांची निर्घृणपणे हत्या होऊनही योग्य न्याय मिळाला नाही. राज्यपालांना भेटून त्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्याबरोबरच देशमुख प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीमाना द्यावा.– संभाजीराजे भोसले, स्वराज्य पक्षाचे नेते
गुन्हेगारीचे उदात्तीकरण करू नये. वाल्मिक कराडवर ३०२ गुन्हा दाखल करावा. तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. बीडमधील यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांची चौकशी करावी.– जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली गेली. या एसआयटीतले अधिकारी बीड जिल्ह्यातील आहेत. तसेच आरोपीशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे एसआयटीतील अधिकाऱ्यांना बदलण्यात यावे. – विजय वडेट्टीवार, काँग्रेस आमदार